काश्मिरी मुलींच्या ‘प्रगाश’   अर्थात प्रकाश या एकमेव आणि पहिल्यावहिल्या रॉकबँडला प्रतिगामी मंडळींनी विरोध केला असून त्यांना ऑनलाइन धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे या रॉकबँडने जाहीर कार्यक्रमांना काही काळापुरती स्थगिती दिली आहे.
किशोरवयीन मुलींनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये बॅटल ऑफ बँड्स या स्पर्धेत अतिशय छान सादरीकरण केले होते, तेव्हापासून या बँडचा बोलबाला होता. परंतु आता या बँडमधील मुलींना धमक्या देण्यात आल्या व अपशब्दही वापरण्यात आले. या मुलींचे पालक आता धास्तावले असून त्यांनी या मुलींना सबुरीचा सल्ला दिला आहे.
सध्या काश्मीरमध्ये वेगवेगळ्या आकृतिबंधातील बँड अस्तित्वात असून त्यात या मुलींच्या रॉकबँडने चांगले नाव कमावले आहे, त्यात गायक व गिटारवादक नोमा नाझीर, ड्रमर-फराह दिबा व गिटारवादक अनीका खालिद (सर्व दहावीच्या विद्यार्थिनी) यांनी हा बँड स्थापन केला. त्यांना पहिल्याच स्पर्धेत पुरस्कारही मिळाला. ‘इन’ या संगीत अकादमीकडे या रॉकबँडची मालकी असून तेथे या मुली प्रशिक्षण घेत आहेत.
सध्या या बँडकडून एका अल्बमचे काम चालू आहे. काश्मिरी महिलांना टीका नवीन नाही, त्यांनी हा विरोध पत्करून संगीत क्षेत्रात नाव कमावले आहे. त्यात राज बेगम यांच्यासारख्या गायिकेचा समावेश आहे. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
‘दिल्लीवाली लडकी जैसाही इनके साथ भी होना चाहीए’
फेसबुकवर या मुलींच्या रॉकबँडविषयी गरळ ओकले आहे त्यात असे म्हटले आहे की, इनके साथ भी वैसा ही होना चाहिए. जो दिल्ली वाली लडकी के साथ हुआ. बेशरम.
धमक्यांची पोलिस चौकशी
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मुलींच्या रॉकबँडला धमक्या देण्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या मुलींना ज्या धमक्या देण्यात आल्या आहेत त्याची पोलिस चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले. मंदबुद्धीचे लोक अशा पद्धतीने या मुलींना गप्प करू शकणार नाहीत असे सांगून त्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Story img Loader