सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने शाळेत अंदाधुंद गोळीबार केला आहे. या दुर्दैवी घटनेत आठ शाळकरी मुलांसह एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सहा विद्यार्थी आणि एक शिक्षक जखमी झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला अटक केली. आरोपीनं आपल्या वडिलांच्या बंदुकीने हा गोळीबार केला आहे. गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
‘असोसिएट्स प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना बेलग्रेड येथील व्लादिस्लाव रिबनीकर प्राथमिक शाळेत (Vladislav Ribnikar primary school) आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली. आरोपी विद्यार्थ्याच्या नावाची आद्याक्षरं के.के. असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्थानिक पोलिसांनी निवेदनात म्हटलं की, आरोपी विद्यार्थी बा संबंधित शाळेचा विद्यार्थी असून तो १४ वर्षांचा आहे. त्याला शाळेच्या मैदानातून अटक करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं.
खरं तर, सर्बियात सामूहिक गोळीबाराची घटना दुर्मिळ आहे. अलिकडच्या वर्षांत शाळांमध्ये गोळीबाराच्या घटनेची कोणतीही नोंद झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये बाल्कन युद्धात मध्य सर्बियन गावात अंदाधुंद गोळीबारात १३ लोकांचा मृत्यू झाला होता.