पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान प्रदेशात शनिवारी एका प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. संबंधित बस गिलगिटहून रावळपिंडीकडे जात होती. दरम्यान, चिलास येथे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
या हल्ल्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. चिलासचे पोलीस उपायुक्त आरिफ अहमद म्हणाले की, या हल्ल्यात ठार झालेल्या आठपैकी पाच जणांची ओळख पटली आहे. इतर २६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, बसमध्ये असलेल्या दोन लष्करी सैनिकांचाही मृतांमध्ये समावेश आहे. तसेच या हल्ल्यात स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा एक कर्मचारीही जखमी झाला आहे. बसमधील बहुतेक प्रवासी कोहिस्तान, पेशावर, घिझर, चिलास, राऊंडू, स्कर्दू, मानसेहरा आणि स्वाबी प्रदेशातील होते. हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हल्ल्याच्या तपासाला सुरुवात झाली असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.