OpenAI whistleblower Suchir Balaji found dead in apartment : ‘चॅटजीपीटी’ बनवणारी कंपनी ‘ओपनएआय’ (OpenAI) या कंपनीचा माजी कर्मचारी आणि भारतीय-अमेरिकन संशोधक सुचिर बालाजी (Suchir Balaji) हा २६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को येथील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे. सुचिरने ओपनएआय (OpenAi) कंपनीच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे टीका केली होती, त्यानंतर तो मृतअवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
२६ वर्षीय सुचिरचा मृत्यू आत्महत्या असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. तसेच घातपात झाल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ओपनएआय बरोबर चार वर्ष काम केल्यानंतर सुचिर बालाजी याने ऑगस्ट महिन्यात कंपनी सोडली होती. सुचिर बालाजी हा चॅटजीपीटी सारख्या जनरेटिव्ह एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी कॉपीराइट केलेल्या सामग्रीच्या वापराबद्दल सातत्याने चिंता व्यक्त करत आला होता.
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सुचिर बालाजी (Suchir Balaji) यांने ओपनएआय कंपनीची डेटा गोळा करण्याची पद्धत हानिकारक असल्याचे म्हटले होते. तसेच मोठ्या प्रमाणात इंटरनेट डेटावर GPT-4 ला प्रशिक्षित करण्याबद्दल चिंता व्यक्त करताना तो म्हणाला होता की, “मला जे वाटतंय त्यावर तुम्ही विश्वास ठेवला, तर तुम्हाला कंपनी सोडावी लागेल”. जनरेटीव्ह एआय सिस्टम त्यांच्या प्रशिक्षणात वापरलेल्या मूळ कॉपीराइट कामाच्या तोडीचे आउटपुट कसे तयार करू शकते यासंबंधी सुचिर बालाजी याने चिंता व्यक्त केली होती.
शिकागो ट्रिब्यूनच्या ब्लॉग पोस्टनुसार, चॅटजीपीटीने त्यांच्या ट्रेनिंग डेटाचा योग्य वापर (Fair use) केल्याचे दाखवून देणारा एकही घटक आढळला नसल्याचे बालाजी याने म्हटले होते. तसेच त्याने हे प्रकरण ओपनएआय कंपनीपेक्षाही खूप मोठा असल्याचे त्याने नमूद केले होते. तो म्हणाला होता की, “योग्य वापर (Fair use) आणि जनरेटिव्ह एआय ही कोणत्याही एका उत्पादन किंवा कंपनीपेक्षा खूप मोठी समस्या आहे.”
अनेक समूहांचे कंपनीविरोधात दावे
द न्यू यॉर्क टाइम्स सारख्या प्रमुख माध्यम समूहानी ओपनएआय विरोधात खटले दाखल केले आहेत. यामध्ये कंपनीची कार्यपद्धती कॉपीराइट कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या खटल्यांसंबंधी न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये बालाजी याचे नाव होते. ओपनएआय कंपनीकडून मात्र सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. दरम्यान सुचिर बालाजी याच्या मृत्यूमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संबंधीत तंत्रज्ञानाच्या नैतिक आणि कायदेशीर परिणामांबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत.
जगभरात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यादरम्यान गेल्या दोन वर्षांत अनेक व्यक्तींनी तसेच उद्योगांनी ओपनएआय यासह वेगवेगळ्या कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांविरोधात दावे दाखल केले आहेत. ज्यामध्ये या तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी कॉपीराइट असलेला साहित्य बेकायदेशीरपणे वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये द न्यूयॉर्क टाइम्सने ओपनएआय आणि त्यांची भागीदार कंपनी मायक्रोसॉफ्ट विरोधात खटला दाखल केला आहे. चॅटबॉट्स तयार करण्यासाठी द न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केलेले लाखो लेख वापरल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे.