न्यू यॉर्क : ‘चॅटजीपीटी’ची निर्माता कंपनी ‘ओपनआय’ने मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमॅन यांना शुक्रवारी पदावरून हटवले. कंपनीच्या या निर्णयाला विरोध करत ‘ओपनआय’चे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमॅन यांनीही पदाचा राजीनामा दिला. या घटनेनंतर तंत्रज्ञान उद्योगात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
‘ओपनआय’च्या मंडळाचा अल्टमॅन यांच्यावर आता विश्वास राहिला नाही, असे कंपनीने एका ‘ब्लॉग’मध्ये हकालपट्टीच्या निर्णयानंतर स्पष्टीकरण दिले आहे. ‘ओपनआय’च्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्या कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा शोध घेणार आहेत, असे कंपनीने सांगितले. अल्टमॅन यांनी ‘एक्स’वर सांगितले की, ‘ओपनआय’मध्ये काम करणे माझ्यासाठी आनंददायी होते. येथे बुद्धिजीवी लोकांबरोबर काम करता आले.दरम्यान, एखाद्या कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्याची ही पहिलीच घटना नाही.