नुकतीच एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि ईडीनं देशभरात विविध ठिकाणी केलेल्या संयुक्त छापेमारीमध्ये पीएफआय या संघटनेवर मोठी कारवाई करण्यात आली. यानंतर आता पुन्हा एकदा देशातील तपास यंत्रणांनी केलेल्या एका मोठ्या संयुक्त कारवाईमध्ये देशातील ड्रग्स माफियांना मोठा झटका दिला आहे. सीबीआयनं या संपूर्ण मोहिमेचं नियोजन केलं होतं. ‘ऑपरेशन गरुड’ अंतर्गत देशभरात ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये सीबीआयसोबत अंमली पदार्थविरोधी विभाग (NCB) आणि वेगवेगळ्या राज्यांच्या पोलीस दलाचाही समावेश होता. विशेष म्हणजे या मोहिमेत इंटरपोललाही सहभागी करण्यात आलं होतं. त्यामुळे हा ड्रग्स माफियांना मोठा झटका मानला जात आहे.
गुरुवारी ऑपरेशन गरुडअंतर्गत तपास यंत्रणांनी देशभरात विविध ठिकाणी छापा टाकून तब्बल १७५ जणांना अटक केली आहे. यासंदर्भात एकूण १२७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पंजाब, हरयाणा, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली आणि मणिपूर या राज्यांमध्ये प्रामुख्याने ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्स ताब्यात घेण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.