सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने २४ एप्रिलपासून ‘ऑपरेशन कावेरी’ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेद्वारे जल आणि हवाई मार्गाने हजारो भारतीयांना मायदेशात परत आणण्यात भारत सरकार यशस्वी झालं आहे. या मोहीमेअंतर्गत तब्बल ३,८६२ भारतीय सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यानंतर आता ही मोहीम बंद करण्यात आली आहे. भारतीय वायूसेनेचं शेवटचं विमान शुक्रवारी ४७ भारतीय नागरिकांना घेऊन मायदेशी परतलं. त्यानंतर ही मोहीम थांबवत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
सुदानचे लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह बुरहान आणि ‘रॅपिड सपोर्ट ग्रुप’ (आर.एस.एफ.) या निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दगालो या दोन बलवान नेत्यांमध्ये सत्तेसाठी संघर्ष पेटला आहे. युद्धविरामाची शक्यता मावळल्यानंतर विविध देशांनी आपले राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांना सुदानबाहेर काढण्याची प्रक्रिया हाती घेतली. सुदानमध्ये जवळपास चार हजारांच्या आसपास भारतीय नागरिक होते. दरम्यान, भारत सरकारने ३,८६२ नागरिकांना मायदेशी परत आणलं आहे.
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी १७ उड्डाणं केली. तसेच भारतीय नौदलाने पोर्ट सुदानहून भारतीयांना सौदी अरबच्या जेद्दा बंदरावर आणलं. तिथून पाच विमानांनी उड्डाण केलं. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने सुदानच्या सीमेला लागून असलेल्या देशांमधील मार्गांनी ८६ भारतीयांना मायेशी आणलं. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत मदत केल्याबद्दल सौदी अरबचे आभार मानले. तसेच चाड, इजिप्त, फ्रान्स, दक्षिण सुदान, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले.
ऑपरेशन कावेरीबद्दल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचं कौतुक करायला हवं. त्यांच्या धैर्याचं कौतुक व्हायला हवं. खार्तूम (सुदान) येथील आमच्या दूतावासाने या कठीण काळात विलक्षण समर्पण दाखवलं आहे.