कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून ‘ऑपरेशन लोटस’ सुरु आहे असा आरोप कर्नाटकचे जलसिंचन मंत्री डी.के.शिवकुमार यांनी केला आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजपा नेत्यांसोबत आहेत असा दावा शिवकुमार यांनी केला. राज्यात घोडेबाजार सुरु आहे. आमचे तीन आमदार मुंबईत हॉटेलमध्ये असून भाजपा आमदार आणि नेते त्यांच्यासोबत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय सुरु आहे आणि आमदारांना काय-काय प्रलोभने दाखवली जात आहेत त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे असे शिवकुमार म्हणाले. २००८ साली कर्नाटकात तत्कालिन येडियुरप्पा सरकार टिकवून ठेवण्यासाठी त्यावेळी भाजपाने विरोधी पक्षाच्या काही आमदारांना प्रलोभन, आमिषं दाखवली होती ते ‘ऑपरेशन लोटस’ म्हणून ओळखले जाते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

शिवकुमार यांना काँग्रेसचे संकटमोचक म्हटले जाते. मागच्यावर्षी राज्यात जेडीएस-काँग्रेस सरकार स्थापन करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्यावर भाजपाबद्दल सौम्य भूमिका स्वीकारल्याचा आरोप केला. आमचे मुख्यमंत्री भाजपाबद्दल थोडे सौम्य आहेत. त्यांना जे सत्य माहित आहे ते सर्वांसमोर त्यांनी उघड केलेले नाही या अर्थाने मी त्यांना सौम्य म्हटले.

भाजपाकडून जी कारस्थान सुरु आहेत त्याची सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. त्यांनी सिद्धारामय्या यांना सुद्धा सांगितले. मुख्यमंत्र्यांनी वेट अँड वॉचचे धोरण स्वीकारले आहे. मी त्यांच्याजागी असतो तर २४ तासात सर्व काही उघड केले असते असे शिवकुमार म्हणाले. २२४ सदस्यांच्या कर्नाटकात विधानसभेत १०४ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला पण काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येत सरकार स्थापन केले. फक्त भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने अवघ्या ३७ जागा जिंकणाऱ्या जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिले. काँग्रेसने ८० जागांवर विजय मिळवला.