देशात करोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होताना दिसू लागला आहे. काही राज्यांमध्ये रुग्णवाढीचा वेग इतर राज्यांपेक्षा जास्त आहे महाराष्ट्रात देखील वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचार करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता भारतीय नौदलानं करोनाविरोधातल्या लढ्यासाठी कंबर कसली आहे. भारताच्या करोनाविरोधी लढ्याला मदत म्हणून आता भारतीय नौदलानं Operation Samudra Setu II ला सुरुवात केली आहे. या मोहिमेमध्ये इतर देशांमधून समुद्रमार्गे ऑक्सिजन भारतात आणण्यासाठी भारतीय नौदलानं सुरुवात केली आहे. या ऑक्सिजनचा मोठा हातभार भारतातील रुग्णालयांना करोनाविरोधात मिळण्याची शक्यता आहे!
भारताच्या चार युद्धनौका मोहिमेवर रवाना!
एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार भारतीय नौदलाने INS Kolkata, INS Talvar, INS Jalashwa आणि INS Airavat या युद्धनौका भारताची ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी या मोहिमेत उतरवल्या आहेत. “भारतात सध्या ऑक्सिजन एक्स्प्रेस मोहीम सुरू असून त्या मोहिमेला हातभार म्हणून नौदलानं ऑपरेशन समुद्र सेतू २ सुरू केलं आहे. देशाच्या कोविड विरुद्धच्या लढ्याला मदत करण्यासाठी भारताच्या युद्धनौका इतर देशांमधून ऑक्सिजनचे कंटेनर आणि इतर वैद्यकीय उपकरणं भारतात आणतील”, अशी माहिती देशाते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करून दिली आहे.
The @indiannavy has launched Operation Samudra Setu-II to augment the ongoing national mission for meeting the Oxygen requirements.
The Indian Naval ships will undertake shipment of Oxygen filled containers and other medical equipment in support of India’s fight against COVID-19 pic.twitter.com/lFjshZkCIb
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) April 30, 2021
या युद्धनौकांपैकी आयएनएस कोलकाता आणि आयएनएस तलवार बहारीनच्या मनामा बंदरात सध्या असून त्या लवकरच मुंबईत तब्बल ४० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचे कंटेनर्स आणणार आहेत. त्याच प्रकारे ऑक्सिजन आणण्यासाठीच आयएनएस जलाश्व बँकॉककडे तर आयएनएस ऐरावत सिंगापूरकडे रवाना झाल्या आहेत, अशी माहिती देखील राजनाथ सिंह यांनी ट्वीटमधून दिली आहे.
Two ships *INS Kolkata and INS Talwar have entered port of Manama, Bahrain* for embarking and transporting *40MT of liquid oxygen to Mumbai*.
*INS Jalashwa is enroute to Bangkok and INS Airavat to Singapore for similar missions*.
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) April 30, 2021
गेल्या वर्षीही नौदलानं केली होती मोठी कामगिरी!
गेल्या वर्षी भारतीय नौदलाने अशाच प्रकारे वंदे भारत मिशनचा एक भाग म्हणून ऑपरेशन समुद्र सेतूला सुरुवात केली होती. त्या वेळी मालदीव, श्रीलंका आणि इराणमध्ये अडकलेल्या सुमारे ३ हजार ९९२ नागरिकांना नौदलानं पुन्हा भारतात सुखरूप आणलं होतं.
दरम्यान, कोविड विरोधातल्या लढ्यासाठी मदत म्हणून भारतीय नौदलाची एकूण ५७ सदस्यांचं वैद्यकीय पथक २९ एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये पाठवण्यात आलं आहे. या पथकामध्ये एकूण ४ तज्ज्ञ डॉक्टर, ७ नर्स, २६ पॅरामेडिक आणि २० सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. हे पथक पीएम केअर कोविड हॉस्पिटलमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. सुरुवातीला दोन महिन्यांसाठी हे पथक नियुक्त करण्यात आलं असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ देखील करता येणं शक्य होणार आहे.