काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील केरण क्षेत्रावर दहशतवाद्यांच्या मदतीने कब्जा करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय लष्कराने १५ दिवसांच्या धुमश्चक्रीनंतर हाणून पाडला. १९९९च्या कारगिल घुसखोरीनंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदाच झालेल्या घुसखोरीला परतवून लावत लष्कराने ८ दहशतवाद्यांना ठार केले व तब्बल महिनाभर पुरला असता इतका शस्त्रास्त्रसाठा जप्त केला. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीशिवाय अशी घुसखोरी शक्य नसल्याचे सांगत भारताचे लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनी थेट पाकिस्तानकडे बोट दाखवल्याने भारत-पाक शांतता चर्चेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी सुमारे ३०-४० दहशतवादी केरण क्षेत्रात भारतीय सीमेपासून ३०० मीटर आत शिरल्याचे उघड झाल्यानंतर लष्कराने जोरदार कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांनी केरण क्षेत्रावर कब्जा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले होते, मात्र लष्कराने याचा वेळोवेळी इन्कार केला होता. सुमारे १५ दिवस चाललेली ही कारवाई मंगळवारी थांबवण्यात आल्याचे लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख ले. जन. संजीव छाचरा यांनी सांगितले. ‘केरण क्षेत्रात घुसखोरी करण्यास अनेक ठिकाणी वाव आहे. घुसखोरीबाबत आम्हाला ठोस गुप्तचर माहिती मिळाली होती. ते कुठे आहेत हे आम्हाला माहीत होते व त्यांना कसे हाकलायचे याची आम्ही पूर्ण तयारी केली होती. यातील घुसखोरीचे काही प्रयत्न हाणून पाडण्यात आले, तर काही नष्ट करण्यात आले. एके १८ रायफलींसह ५९ शस्त्रे यात ताब्यात घेण्यात आली,’ असे छाचरा यांनी सांगितले. कारवाईची मोहीम थांबविण्यात आली असली तरी आता यापुढील मोहिमा या गुप्तचर पातळीवर राबवल्या जातील. त्यामुळे घुसखोरीचा धोका कमी होऊन या आव्हानाला अधिक सक्षमपणे तोंड देता येईल, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनी उत्तर प्रदेशमधील हिंदन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कारवाईबद्दल माहिती दिली. ‘हा घुसखोरीचा आटोकाट प्रयत्न होता. मात्र आम्ही तो हाणून पाडला,’ असे ते म्हणाले. मात्र दहशतवाद्यांनी या भागाचा ताबा घेतल्याचे वृत्त त्यांनी साफ फेटाळून लावले. ‘दहशतवादी एका नाल्यावर दडून बसले होते. त्यांना ताबाच घ्यायचा असता तर ते तेथेच का बसले असते,’ असा सवाल त्यांनी केला.
पाकिस्तानकडे थेट बोट
केरणमधील घुसखोरीमागे पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचे लष्करप्रमुखांनी सांगितले. ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारत-पाक लष्कर काटेकोरपणे लक्ष ठेवून असतो. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या नकळत दहशतवाद्यांना त्यांच्या कारवाया करणे शक्य नाही. पाकिस्तानी लष्कराचा त्यांना पाठिंबा असला पाहिजे. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीशिवाय नियंत्रण रेषेवर कोणतीही दहशतवादी कारवाई होऊ शकत नाही,’ असे ते म्हणाले. केरण क्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने गोळीबार करत दहशतवाद्यांना आत शिरण्यासाठी संरक्षण दिल्याचेही ते म्हणाले.
महिनाभर पुरेल इतका शस्त्रसाठा
केरणमधील घुसखोरीची तुलना कारगिलशी करणे चुकीचे असल्याचे लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनी म्हटले असले तरी सुमारे या कारवाईदरम्यान लष्कराच्या हाती आलेली शस्त्रास्त्रे पाहता दहशतवादी आणखी महिनाभर लढा देण्याच्या हिशोबाने आले होते, असे दिसून आले आहे. केरणमध्ये झालेल्या कारवाईदरम्यान २३ एके-४७ रायफलींसह ६६ शस्त्रे जप्त करण्यात आली. मंगळवारी पाच एके रायफली, दोन पिस्तुले आणि १७ ग्रेनेड लाँचर हस्तगत करण्यात आले. याशिवाय १४ पिस्तूल, एक स्नायपर रायफल, २० ग्रेनेड लाँचर, सात रेडिओ संच, औषधे, खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. गेल्या तीन दिवसांत लष्कराने फतेह गली व गुज्जरदार येथे सात घुसखोरांना ठार मारले असून, वेंकोरा बारामुल्ला येथे ३०-३५ घुसखोरांच्या विरोधात मोहीम राबवली होती. या वेळी बारामुल्ला येथे सापडलेल्या शस्त्रात डिस्पोजल रॉकेट लाँचर, दोन रॉकेट ग्रेनेड, एक एके ५६ रायफल, चार एके ५६ रायफल काडतुसे, एक पिस्तूल, बराच दारूगोळा व रेडिओ संच अशी सामग्री सापडली.
‘मिनी कारगिल’ युद्ध संपुष्टात!
काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील केरण क्षेत्रावर दहशतवाद्यांच्या मदतीने कब्जा करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय लष्कराने १५ दिवसांच्या धुमश्चक्रीनंतर हाणून पाडला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-10-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Operations against terrorists in keran sector of kashmir called off senior army officer says in srinagar