आगामी लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. इंडिया आणि एनडीए यांच्यात यंदा कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन टर्मपासून सत्तेवर असलेल्या National Democratic Alliance (NDA)ला सत्ता कायम ठेवण्यात यश मिळतंय की इंडिया (INDIA) आघाडीमुळे सत्तांतर घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अनेकांचे ओपिनिअन पोल्स समोर आले आहेत. आता इंडिया टुडे आणि सी वोटरने केलेल्या मूड ऑफ नेशनच्या सर्व्हेतही वेगळा अहवाल प्राप्त झाला आहे.
जर संसदीय निवडणुका आता झाल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला ३०६ जागा सहज मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मूड ऑफ द नेशनच्या पोलनुसार एनडीए ३०६ जागा, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला १९३, तर इतर राजकीय पक्षांना ४४ जागा मिळतील असा अंदाज आहे.
एनडीएला बहुमत, पण जागा घटणार
जानेवारी २०२३ मध्ये इंडिया टुडेने केलेल्या सर्वेनुसार एनडीएला २९८ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, आताच्या सर्वेनुसार एनडीए ३०६ जागांवर यश मिळवू शकते असं म्हटलं आहे. परंतु, २०१९ मध्ये एनडीएने लोकसभा निवडणुकीत ३५७ जिंकल्या होत्या. म्हणजेच या सर्वेनुसार, भाजपा सत्ता स्थापन करण्यास यशस्वी झाली तरी त्यांची जागांची एकूण आकडेवारी कमी झालेली असेल. तर, दुसरीकडे नव्याने स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला १९३ जागा मिळतील असा अंदाज आहे. जानेवारीतील सर्व्हेक्षणानुसार, विरोधकांना १५३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
कोणाची टक्केवारी किती असेल?
आज सार्वत्रिक निवडणुका झाल्यास एनडीएला एकूण ४३ टक्के मते तर इंडिया आघाडीला ४१ टक्के मते मिळतील असंही मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
भाजपा आणि काँग्रेसला किती जागा मिळणार?
एनडीए आघाडीवर असला तरी भाजपा २८७ जागांवर विजयी होईल, तर, काँग्रेस अवघ्या ७४ जागांवर यश मिळवू शकेल असं म्हटलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, ओपिनिअन पोलनुसार, आज निवडणुका झाल्या तर भाजपाचा जागा घटण्याची शक्यता आहे.
कसं झालं सर्वेक्षण
१५ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान केलेल्या या सर्वेक्षणासाठी सर्व राज्यांमध्ये २५ हजार ९५१ लोकांशी संवाद साधण्यात आला. तसंच, नियमित ट्रॅकर डेटाव्यतिरिक्त १ लाख ३४ हजार ४८७ मतदारांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल काढण्यात आला आहे.