महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले, मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रतीक्षा आहे ती चार जून रोजीच्या मतमोजणीची. मतदान ते मतमोजणी या दरम्यानच्या कालावधीत उमेदवार, राजकीय पक्ष आणि विश्लेषकही आपापल्या परीने मतदानाच्या आधारे निकालाचे अंदाज बांधत आहेत. मात्र, प्रत्यक्ष मतदानादरम्यान निर्णायक ठरलेल्या मुद्द्यांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न…
संजय मोहिते
बुलढाणा : चुरशीची तिरंगी लढत ठरलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतविभाजनाचा मुद्दा कळीचा ठरला. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यासाठी जोर लावला यामुळे लढत अप्रत्यक्षपणे ‘मातोश्री’ विरुद्ध ‘वर्षा’ अशी झाली. सेनेतील बंडखोरीचे केंद्र ठरलेल्या बुलढाण्यात गद्दारांना पराभूत करायचेच हा ठाकरेंचा तर खरी शिवसेना आमची हे सिद्ध करणे शिंदे यांचा निर्धार होता. ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी ‘गद्दार विरुद्ध खुद्दार’ हा मुद्दा मतदानापर्यंत लावून धरला. त्याचा परिणाम या मतदारसंघातील निकालावर नक्की जाणवेल.
शिवसेनेचे दोन्ही गट आणि अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर अशी मुख्य तिरंगी लढत असली तरी, वंचितचे वसंत मगर आणि अपक्ष संदीप शेळके कुणाची मते आपल्याकडे खेचतात, यालाही महत्त्व आहे. चौथ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरणारे प्रतापराव जाधव यांच्याविरुद्ध जाऊ शकणारी प्रस्थापितविरोधी मतेही विभागली गेली आहेत. जातीय, धार्मिक ध्रुवीकरण हा मुद्दाही येथे निर्णायक ठरेल.
बुलढाण्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतांची टक्केवारी ५३ टक्क्यांच्या आत होती. मात्र शेवटच्या एका तासात तब्बल १ लाख ७४ हजार ५१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे अंतिम मतदान ६२.०३ इतके झाले. हे वाढीव मतदान ज्यांना गेले तो विजयी होईल, असा अंदाज आहे.
पश्चिम नागपूरचा कल महत्त्वाचा?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे अशी थेट लढत नागपूरमध्ये झाली. सुमारे २२ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात ५४ टक्केच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. घसरलेली मतदानाची टक्केवारी दोन्ही पक्षांसाठी चिंतेची बाब असली तरी दोन्ही पक्ष सकाळ, संध्याकाळच्या सत्रात झालेल्या मतदानाच्या गर्दीवर आपला दावा सांगत आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केला तर सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजपकडे तर दोन काँग्रेसकडे आहेत. २०१९ च्या निवडणुकीत गडकरी यांना उत्तर नागपूर वगळता सर्व पाच विधानसभा मतदारसंघांतून मताधिक्य मिळाले होते.
भाजपची भिस्त पूर्व नागपूर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या दोन विधानसभा मतदारसंघांतून मिळणाऱ्या मताधिक्यावर आहे तर काँग्रेसला उत्तर व पश्चिम नागपूरमधून आघाडीची अपेक्षा आहे. उत्तर नागपूरमध्ये २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला ९ हजारांची आघाडी मिळाली होती. या वेळी दलित मतांमध्ये विभाजन नसल्याने त्यात भर पडेल अशी काँग्रेसला आशा आहे.
काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे प्रतिनिधित्व करीत असलेल्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत गडकरी यांना २७ हजारांची आघाडी मिळाली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ती भरून काढत ठाकरे येथून विजयी झाले होते. आता येथील मतदार कोणाच्या पारड्यात भरभरून मते टाकतात, यावरही विजयाचे गणित अवलंबून असेल.
मध्य नागपूर, दक्षिण नागपूरमध्ये भाजप व काँग्रेसला समान संधी आहे. वंचित आणि एआयएमआयएमचा उमेदवार नसल्याने काँग्रेसच्या मतांमध्ये विभाजन यंदा टळले. बसपची ताकद मर्यादित आहे. जातीय समीकरणाचा विचार करता कुणबी, दलित आणि हलबा मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
जातीय समीकरणांवर लक्ष– प्रबोध देशपांडे
अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या साडेतीन दशकांमध्ये तिरंगी लढत नेहमीच भाजपसाठी पोषक राहिली. मात्र, यंदा बदललेल्या जातीय तसेच राजकीय समीकरणांमुळे तिरंगी लढतीचा फायदा कुणाला होईल, याबाबत अद्याप अंदाज बांधले जात आहेत. २०१४ व २०१९ मध्ये काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार दिल्याने निवडणुकीला धार्मिक रंग चढला होता. या वेळेस राजकीय समीकरणात मोठा बदल झाला. भाजपने या वेळी अनुप धोत्रे यांना संधी दिली, तर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सलग अकराव्यांदा अकोल्यातून आपले नशीब अजमावले. काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांच्या रूपाने मराठा उमेदवार देऊन विरोधकांना शह देण्याची खेळी खेळली.
अकोल्यात जातीय राजकारण व मतविभाजन नेहमीच वरचढ ठरले आहे. मतदारसंघात मराठा मतदारांचे प्राबल्य आहे. मात्र, यंदा ही मतपेढी विभागली गेली असण्याची शक्यता आहे. मतदारसंघातील मुस्लीम मतांचीही काँग्रेस आणि वंचितमध्ये प्रामुख्याने विभागणी झाल्याचा अंदाज आहे. एकूणच या मतदारसंघातील विजयाचे समीकरण जातीय मतविभागणीवर अवलंबून असेल. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात वाढलेला मतदानाचा टक्काही निर्णायक ठरू शकेल.
वाढलेले मतदान निर्णाय–प्रशांत देशमुख
वर्धा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांच्यातच प्रमुख लढत झाली. मतदानाच्या दिवसापर्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत कोणाचे पारडे जड राहिले, याबाबत विश्लेषकांप्रमाणे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांतही मतभिन्नता आहे. मात्र, निवडणुकीत वाढलेले मतदान हा येथे निर्णायक मुद्दा ठरू शकेल.
सहा विधानसभा मतदारसंघांपैकी अमर काळे आमदार असलेल्या आर्वी मतदारसंघात सर्वाधिक ६८.९८ टक्के मतदान झाले. तर धामणगाव-६१.७१, मोर्शी-६५.०१, देवळी-६५.६१, हिंगणघाट-६५.९१ तर वर्धा मतदारसंघात ६२.५३ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत या वेळी अडीच टक्क्याने मतदान वाढले. आर्वी हा काळे यांचा मतदारसंघ असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आर्वी तालुक्यातच झाली होती. त्यामुळे एकीकडे काळे समर्थक वाढलेल्या मतदानाकडे बोट दाखवून विजयाचा दावा करत असताना भाजपचे नेते मोदींच्या सभेला मिळालेला प्रतिसाद निर्णायक ठरेल, असे सांगत आहेत.
सत्ताधाऱ्यांवर शेतकऱ्यांची ही नाराजी असल्याचे काँग्रेस नेते म्हणतात तर शेतकरी हिताचे निर्णय घेतल्याने हे मतदान आमच्याच पथ्यावर पडल्याचे तडस समर्थक सांगतात. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात वाढलेले मतदान कुणाच्या विजयाची वाट सुकर करेल, हे पाहावे लागेल.