पूंछमध्ये नियंत्रण रेषेवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराला क्लिन चीट देणाऱया संरक्षणमंत्री ए. के. अॅंटनी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी बुधवारी लोकसभेत केली. या मागणीवरून विरोधकांनी अॅंटनी यांच्याविरोधात घोषणाबाजी देत गोंधळ घातल्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही भाजपच्या व्यंकय्या नायडू यांनी हाच मुद्दा उपस्थित केला आणि त्यावरून गोंधळ झाल्यामुळे प्रश्नोत्तराचा तास तहकूब करण्यात आला.
पूंछमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर अॅंटनी यांनी संसदेमध्ये केलेले निवेदन आणि त्यापूर्वी भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात तफावत आहे, याकडे सुषमा स्वराज यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी पूंछमधील सरला छावणी हल्ला केल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यानंतर अॅंटनी यांनी संसदेमध्ये केलेल्या निवेदनात पाकिस्तानी लष्कराने हा हल्ला केल्याची माहिती काढून टाकण्यात आली आणि पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. याच मुद्द्यावरून बुधवारी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अॅंटनी यांनी लोकसभेत येऊन देशाची माफी मागावी, अशी मागणी स्वराज यांनी केली. स्वराज बोलत असताना पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग लोकसभेमध्ये उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांनी या विषयावर निवेदन करावे, अशीही मागणी केली. त्यानंतर विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
अग्रलेख – एक खेळ : शांतता-शांतता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा