नवी दिल्ली : लोकसभाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ओम बिर्लांनी लगेचच मांडलेल्या आणीबाणीच्या निषेधाच्या प्रस्तावावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व ‘इंडिया’तील घटक पक्षांतील नेत्यांनी बिर्लांची गुरुवारी भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. आणीबाणीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने संसदेमध्ये कोंडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याविरोधात आक्रमक रणनीती अवलंबली जाण्याचे संकेत या भेटीतून देण्यात आले आहेत.

आणीबाणीसंदर्भातील प्रस्ताव मांडणे व दोन मिनिटांचे मौन पाळण्याचे आवाहन या दोन्ही गोष्टी करण्याची खरोखरच गरज नव्हती, अशी इंडियाची भूमिका राहुल गांधींनी बिर्लांसमोर स्पष्ट केल्याचे समजते. राहुल गांधींच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे, मिसा भारती, कणिमोळी आदींचा समावेश होता.

हेही वाचा >>>प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना ‘पेन पिंटर पुरस्कार २०२४’ जाहीर

लोकसभेतील बिर्लांची कृती अत्यंत गंभीर असून त्याचा संसदेच्या कामकाजावर विपरित परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. संसदेच्या प्रथा व परंपरेला धक्का लागल्याची भावनाही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बोलून दाखवल्याचे समजते. तसे पत्र काँग्रेसचे खासदार व संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवले आहे. यामध्ये प्रस्तावावर आक्षेप घेण्यात आला आहे.

बिर्लांची भेट ही शिष्टाचाराचा भाग होता. या भेटीदरम्यान राहुल गांधींनी आणीबाणीचा मुद्दाही लोकसभाध्यक्षांसमोर मांडल्याची माहिती वेणुगोपाल यांनी पत्रकारांना दिली. लोकसभेमध्ये गुरुवारी बिर्लांनी राहुल गांधी यांची अधिकृतपणे विरोधीपक्षनेतपदी नियुक्ती केली. त्यानंतर राहुल गांधींनी बिर्लांची भेट घेतली.

लोकसभाध्यक्षांनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही अभिभाषणामध्ये आणीबाणीचा उल्लेख केल्यामुळे केंद्र सरकार व भाजपच्या अजेंड्याला प्रत्युत्तर देण्याची रणनीती ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत निश्चित करण्यात आली. यासंदर्भात काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी गुरुवारी ‘इंडिया’तील नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये आणीबाणी, पेपरफुटी, हमीभाव आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे समजते.