* पंतप्रधान पदासाठी नितीश कुमार उमेदवार नाहीत!
* लोकसभा निवडणुकीतील व्यूहरचनेचा खल
गुजरात दंगली रोखण्यात अपयश आलेले नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यास आपला तीव्र विरोध आहे मात्र त्याचवेळी भाजपच्या मैत्रीला छेद देऊन काँग्रेसशी सख्य करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका संयुक्त जनता दल कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी घेण्यात आली. त्याचबरोबर नीतिश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, असा त्रिवार उच्चार पक्षप्रवक्ते के. सी. त्यागी यांनी केला.
भाजपप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचा मोदीविरोध आजवर वेळोवेळी उघड झाला असला तरी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या व्यासपीठावर शनिवारी तो प्रथमच अधिकृतपणे मांडला गेला.
भाजपनेही मोदी यांचे नाव अधिकृतपणे मांडलेले नाही. लोकसभा निवडणुकीलाही बराच वेळ आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचे नाव जाहीर करण्यासाठी आम्ही भाजपवर दबाव आणणार नाही, असेही त्यागी यांनी स्पष्ट केले. रविवारी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी नीतिश कुमार आणि शरद यादव आपली भूमिका मांडणार असून रालोआच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबतचा आमचा निर्णयही आम्ही रविवारीच जाहीर करू, असेही त्यागी यांनी सांगितले.
मोदी यांच्या नावावर भाजपमध्येच एकमत नाही, यामुळे त्यांचे नाव पुढे करण्याआधी पक्षातही सहमती आहे का हे तपासावे, अशी संयुक्त जनता दलाच्या प्रमुख नेत्यांची अपेक्षा आहे. काही नेत्यांच्या मते लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच वेळ असल्याने या घडीला भाजपवर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी दबाव आणणे योग्य होणार नाही.  संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्याच्या राजकीय स्थितीविषयी चर्चा होणार आहे. या स्थितीत पक्षाची भूमिका काय असावी, यावर नेते आपली मते मांडतील आणि नंतर त्यातून सहमतीने अंतिम निर्णय निश्चित केला जाईल. भाजप आणि संयुक्त जनता दलाचा ऋणानुबंध बराच जुना आहे, या भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याशीही तिवारी यांनी सहमती दर्शविली. १९९५ पासून आम्ही एकत्र आहोत, असे तिवारी म्हणाले.