हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातील लाचखोरीची विरोधी पक्षांसह सर्वांचे समाधान होईल अशी चौकशी करण्यास, प्रसंगी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यास केंद्र सरकार तयार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी आज स्पष्ट केले.  गुरुवारपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हेलिकॉप्टर सौदा आणि भगव्या दहशतवादाच्या मुद्दे तापण्याची चिन्हे असताना सरकारने सबुरीची भूमिका घेत विरोधकांना या मुद्यावर शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
२१ फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संरक्षण खात्याचा हेलिकॉप्टर सौदा, भूसंपादन विधेयक, अन्न सुरक्षा विधेयक, महागाई, अफझल गुरुला दिलेली फाशी, माओवाद्यांचा हिंसाचार आदींवर सत्ताधारी आघाडी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी उडण्याची शक्यता आहे. लोकसभेचे नेते व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भगव्या दहशतवादावरून संघ आणि भाजपवर केलेल्या आरोपांबाबत माफी मागावी म्हणून भाजप अडून बसण्याची चिन्हे आहेत. उद्या, शिंदे यांचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपने जंतरमंतरपासून त्यांच्या २, कृष्णा मेनन मार्ग या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. संसदेच्या अधिवेशनात पक्षाच्या डावपेचांवर विचार करण्यासाठी आज भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी सुषमा स्वराज, अरुण जेटली, यशवंत सिन्हा, जसवंत सिंग, रवीशंकर प्रसाद, राजीवप्रताप रुडी आणि शाहनवाझ हुसैन आदींचा समावेश असलेल्या संसदीय पक्षाची बैठक झाली. उद्या, बुधवारी सायंकाळी रालोआच्या बैठकीत भाजप-रालोआची रणनिती निश्चित होईल, असे रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.
संसदेच्या ७९ दिवस चालणाऱ्या अधिवेशनात पूर्वार्धात २१ आणि उत्तरार्धात १३ अशा एकूण ३४ बैठकी होतील. २२ मार्च ते २२ एप्रिलदरम्यानच्या महिन्याभराच्या मध्यंतरानंतर १० मे रोजी या अधिवेशनाचा समारोप होणार आहे. या अधिवेशनात १६ नव्या विधेयकांसह एकूण ७१ विधेयकांवर विचार होण्याची शक्यता आहे. पण रेल्वे अंदाजपत्रक आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पासह वित्तीय मुद्यांशी १३ विषयांवर तसेच मधल्या काळात जारी केलेल्या अध्यादेशांवर प्राधान्याने चर्चा करून संसदेची मंजुरी मिळविण्यावर सरकारने भर दिला आहे. भगवा दहशतवाद तसेच हेलिकॉप्टर सौद्यातील भ्रष्टाचारावरून सरकारला नमवेपर्यंत संसदेचे कामकाज चालू न देण्याचा भाजपचा इरादा आहे. पण संसदेचे कामकाज ठप्प करण्याची ही परंपरा योग्य नाही, अशी टीका कमलनाथ यांनी केली.  शिंदे यांच्या विधानाचे आपण समर्थन करतो, असे सांगून कमलनाथ म्हणाले की, भगव्या दहशतवादावरील टिप्पणीवरून शिंदे यांनी माफी मागण्याचा मुद्दा संसदेत उपस्थित होईल तेव्हा कशासाठी माफी मागायची हेही बघावे लागेल. कमलनाथ यांनी आज संसदेतील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. प्रमुख पक्षांनी गोंधळ घालून संसदेचे कामकाज ठप्प केल्यामुळे वाया जाणारा वेळ चर्चेदरम्यान त्यांना दिल्या जाणाऱ्या वेळेतून वजा करण्याची सूचना छोटय़ा पक्षांनी मांडली असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा