राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी स्वत:हून आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, काल झालेल्या बैठकीनंतर विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरण्यासाठी शरद पवार यांची मनधरणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्ष केवळ सरकारकडून उमेदवार जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, हा उमेदवार सहमतीचा नसेल तर विरोधकांच्या आघाडीकडून शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पुढे केले जाईल.
राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत नाही, पण सहमतीचा उमेदवार हवा!
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, बसपाच्या मायावती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येच्युरी, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, द्रमुकच्या कनिमोळी यांच्यासह सतरा पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रपतीपदासंदर्भात काही ठोस चर्चा झाली नसली तरी वेळ पडल्यास शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत उतरवण्याचा मतप्रवाह पुढे येताना दिसला. याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अजूनपर्यंत कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. सरकारने राष्ट्रपती म्हणून सर्वसहमतीने उमेदवार निवडावा एवढीच आमची अपेक्षा आहे. मात्र, तसे न घडल्यास विरोधी पक्षांकडून शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. राष्ट्रीय राजकारणातला पवारांचा जनसंपर्क पाहता एनडीएतील अनेक घटकपक्षांचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो.
१९९१ मध्ये पंतप्रधानपद थोडक्यात हुकल्याचा कटू अनुभव गाठीशी असल्यामुळे तुर्तास तरी पवार यासाठी उत्सुक नाहीत. मात्र, एनडीएतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेची मते आपल्या बाजूने वळवण्याची ताकद फक्त पवारांकडेच आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. याशिवाय, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावालाही विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. दरम्यान, कालच्या बैठकीत पवार यांनी अशाप्रकारे सरसकट चर्चा करून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवणे योग्य नसल्याचे म्हटले. त्यासाठी तीन किंवा चार जणांची समिती बनवून निर्णय घेतला जावा, असा प्रस्तावही शरद पवार यांनी मांडला.