नवी दिल्ली : मतदारांच्या ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून सोमवारी राज्यसभेत विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातला. या मुद्द्यावर चर्चेची मागणी उपसभापती हरिवंश यांनी फेटाळल्याचा निषेध करत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस तसेच इंडिया आघाडीतील इतर पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.

देशात अनेक मतदारांच्या ओळखपत्रांचा क्रमांक एकसमान असून मतदार याद्यांपासून ओळखपत्रांपर्यंत अनेक प्रकारच्या विसंगती आढळल्या आहेत. हा मुद्दा गंभीर असून त्यावर सभागृहामध्ये चर्चा केली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली. प्रामुख्याने तृणमूल काँग्रेसने सातत्याने नियम २६७अंतर्गत नोटीस दिली होती. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहात बोलण्याची परवानगी मागितली मात्र, उपसभापती हरिवंश यांनी ती नाकारली. त्यानंतर संतप्त विरोधकांनी सभात्याग केला.

सोमवारीही वेगवेगळ्या विषयांवर १६ नोटिसा दिल्या गेल्या पण, उपसभापती हरिवंश यांनी त्या सर्व फेटाळल्या. तृणमूल काँग्रेस व काँग्रेसच्या सदस्यांनी मतदारांच्या ओळखपत्रांच्या मुद्द्यावर तर द्रमुकच्या सदस्यांनी मतदारसंघांच्या फेररचनेसंदर्भात तर माकपच्या सदस्यांनी, ‘स्पेस एक्स’चे संस्थापक व टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीशी जिओ व एअरटेल या कंपन्यांनी केलेल्या कराराच्या परिणामांसंदर्भात चर्चेची नोटीस दिली होती.

धनखड पुन्हा रुजू

राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांनी सोमवारी पुन्हा पदभार सांभाळला. प्रकती बिघडल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धनखड सभागृहात येताच सदस्यांनी त्यांचे स्वागत केले, तसेच वैयक्तिक भेट घेऊन अनेक सदस्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली.