नवी दिल्ली : चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी आक्रमक होत राज्यसभेत शुक्रवारी शून्य प्रहरामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रत्युत्तराला आडकाठी केली. सातत्याने झालेल्या विरोधकांच्या हस्तक्षेपामुळे सीतारामन अत्यंत संतप्त झाल्या, ‘जनसामान्यांच्या प्रश्नांबद्दल काँग्रेसला घेणेदेणे नसून या पक्षाने लोकांचा विश्वासघात केला आहे’, अशी टीका सीतारामन यांनी केली.
तृणमूल काँग्रेसचे खासदार नदीम उल हक यांनी बँक व वित्तीय संस्थांकडून डिजिटल अॅपवरून कर्जपुरवठा होत असून त्याविरोधात असंख्य तक्रारीही केल्या गेल्याचा मुद्दा मांडला. ३० नोव्हेंबर २०२० ते १ एप्रिल २०२१ या काळात १२ हजार ९०३ तक्रारी केल्या गेल्या. काही अॅप बेकायदा असून त्यांच्यावर रिझव्र्ह बँकेचे नियंत्रणही नाही. ११०० अॅपपैकी ६०० अॅप बेकायदा असून त्यातील बहुतांश चिनी आहेत, असे हक म्हणाले. ते बोलत असताना काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला हस्तक्षेप करत होते, खरगेही बोलण्याचा प्रयत्न करत होते. ‘विरोधीपक्ष नेते उभे असताना त्यांना का बोलू दिले जात नाही’, अशी विचारणा काँग्रेसचे सदस्य उपसभापती हरिवंश यांना करत होते. पण, त्याकडे दुर्लक्ष करत उपसभापतींनी सीतारामन यांना उत्तर देण्याची विनंती केली.
‘हा प्रश्न केंद्र सरकारने गांभीर्याने घेतला असून केंद्रीय अर्थ मंत्रालय, रिझव्र्ह बँक व कॉर्पोरेटविषयक मंत्रालय एकत्रितपणे या विरोधात कडक कारवाई करत आहोत’, असे सीतारामन म्हणाल्या. पण, त्यांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षांचे सदस्य व्यत्यय आणत होते. ‘चिनी अॅपवर सभागृहात चर्चा करण्यासाठी वेळ दिला जातो, पण चिनी घुसखोरीवर सदस्यांना बोलू दिले जात नाही’, अशी आक्रमक टिप्पणी काँग्रेस सदस्यांनी केली. या टिप्पणीमुळे सीतारामन अत्यंत संतप्त झाल्या, सीतारामन व विरोधक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. ‘जनसामान्यांचा प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचा नाही का? केंद्र सरकारने या मुद्दय़ांची गंभीर दखल घेतली असून या अॅपविरोधात कारवाईही सुरू केली आहे. छोटय़ा कर्जादारांची फसवणूक रोखली पाहिजे याकडे मोदींनीही लक्ष दिले आहे, पण या प्रश्नाचे गांभीर्य काँग्रेसने लक्षात घेतलेले नाही. काँग्रेस पक्षाने सामान्यांचा विश्वासघात केला आहे’, असे सीतारामन म्हणाल्या.
सीतारामन यांच्या उत्तरानंतरही वरिष्ठ सभागृहामध्ये काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस आदी विरोधी पक्षांच्या सदस्यांचा गदारोळ सुरूच राहिला. विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावर चर्चेसाठी नोटीस दिली नसल्याचे कारण दिले जाते, पण अन्य नियामांअंतर्गत चर्चा केली जाऊ शकते, असे विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. पण, उपसभापती हरिवंश यांनी खरगेंचे म्हणणे फेटाळून लावल्याने काँग्रेसचे सदस्य आणखी आक्रमक झाले. सुरजेवाला, नासीर हुसेन, प्रमोद तिवारी आदी सदस्य सभापतींच्या समोरील हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करून लागल्याने शून्य प्रहारात सभागृह तहकूब झाले. शून्य प्रहर सुरू होताच खरगे यांनी चिनी घुसखोरीवर चर्चेची मागणी केली. राज्यसभेत काँग्रेस व आपच्या ८ सदस्यांनी नोटीस दिली होती.
बोलू का दिले जात नाही : खरगे
सभापती जगदीप धनखड यांनी आपल्यासह दोन ज्येष्ठ सदस्यांना सभागृहात कधीही बोलण्याची परवानगी दिली आहे. असे असताना बोलू का दिले जात नाही असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. चीनच्या घुसखोरीविरोधात बोलण्याचा विरोधक सातत्याने प्रयत्न करत असताना बोलण्यास परवानगी मिळत नसल्याबाबत खरगे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.