उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचारात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. तर २ शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दुसरीकडे भारतीय किसान युनियनने दावा केला आहे की, या हिंसाचारात ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संतापाची लाट असलेली असताना आता काँग्रेसने देखील भाजपावर निशाणा साधला आहे.

“भाजपा शेतकरी चळवळीला, आंदोलनाला थांबवू शकला नाही. म्हणूनच, त्यांनी शेतकऱ्यांशी हे कृत्य केलं. आज या हत्याकांडावर जो कोणी गप्प राहिला आहे त्याने विसरू नये की कालचक्र एक दिवस त्यांनाही लक्ष्य करेल. ही परिस्थितीला सर्वस्वी नरेंद्र मोदींचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी जबाबदार आहेत”, अशी टीका युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी केली. श्रीनिवास यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. तर शेतकरी राकेश टिकैत यांनी म्हटलं की, शेतकरी परतत असताना वाहनांनी त्यांच्यावर हा हल्ला केला आहे.

“मोदीजी, तुम्हाला वेदना कधी जाणवतील?”

“मोदीजी, तुम्ही याआधी एकदा म्हटलं होतं की एखादं कुत्र्याचं पिल्लू जरी गाडीच्या टायरखाली आलं तरी दुःख होतं. पण, आज तर चक्क तुमच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना त्याच्या टायरखाली चिरडलं. यासाठी तुम्हाला वेदना कधी जाणवतील? बोला काहीतरी मिस्टर प्राईम मिनिस्टर?”, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी यांनी आपल्या ट्वीटमार्फत केली आहे.

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी देखील ट्विट करून भाजपाला सुनावलं आहे. “सत्तेची अशी नशा तुम्ही कधी पहिली किंवा ऐकला नसेल. ३ आंदोलक शेतकऱ्यांना मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली चिरडून मारलं. किती शेतकऱ्यांचा बळी जाऊ देणार मोदीजी? मारेकऱ्यांना अटक करा, सीबीआय चौकशी करा, कुटुंबाला नुकसानभरपाई द्या”, अशी मागणी संजय सिंह यांनी केली आहे.

परतणाऱ्या शेतकऱ्यांवर वाहनांमार्फत हल्ला

राकेश टिकैत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करत संगीत की, “शेतकरी परतत होते. परंतु, याच परतणाऱ्या शेतकऱ्यांवर वाहनांमार्फत हल्ला करण्यात आला, गोळीबार करण्यात आला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही लखीमपूरच्या दिशेने रवाना झालो आहोत. तिथे जाऊन शेतकऱ्यांना भेटू.”

Story img Loader