साध्वी निरंजन ज्योती यांचा माफीनामा व त्यावर दोन्ही सभागृहात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनानंतरही विरोधकांचे समाधान झालेले नाही. साध्वी निरंजन ज्योती यांच्या निषेधाचा ठराव राज्यसभेत मांडण्याची मागणी करून सीपीआयएमचे सीताराम येच्युरी यांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून सत्ताधारी संतप्त झाले. तुम्ही तुमची राजकीय लढाई सभागृहाबाहेर लढा, अशा शब्दात राज्यसभेचे सभापती हामीद अन्सारी यांनी येच्युरी यांचा प्रस्ताव अमान्य केला.
लोकसभेत पंतप्रधान मोदी यांनी साध्वी प्रकरणावर निवेदन दिले. निरंजन ज्योती ग्रामीण भागातील नेत्या आहेत. त्यांची मर्यादा लक्षात घेऊन अनुभवी संसद सदस्यांनी त्यांना क्षमा करावी. हा विषय  येथेच थांबवून राष्ट्राला पुढे नेण्यासाठी पुन्हा कार्यरत व्हावे, अशी आर्जवे मोदी यांनी लोकसभेत केली.
तत्पूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस सदस्यांनी संसदेच्या आवारात काळी फीत लावून निदर्शने केली.  लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी यांनी निवेदन दिले. ते म्हणाले की, साध्वींना आपण मोठय़ा मनाने क्षमा केली पाहिजे. केवळ सभागृहातच नव्हे तर सभागृहाबाहेरदेखील बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. साध्वींच्या वक्तव्यावरून आज राज्यसभेचे कामकाज दिवसभरात तीनदा तहकूब झाले. साध्वी यांच्या निषेधाचा ठराव मांडण्याची परवानगी मागून येच्युरी यांनी विरोधकांची कोंडी केली. काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी येच्युरींचे समर्थन केले. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. येच्युरी यांची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. असा प्रस्ताव मांडण्याची एक स्वतंत्र नियम व्यवस्था आहे, याची आठवण केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधकांना करून दिली.
संसदेच्या आवारात निदर्शने करताना राहुल गांधी म्हणाले की, सभागृहात आमची मुस्कटदाबी करून आम्हाला बोलू दिले जात नाही. त्यामुळे आम्ही तोंडावर काळी फीत लावून सभागृहात बसणार आहोत.     
त्यावर तोडगा काढण्याची सूचना उपसभापती पी. जे. कुरियन यांनी सत्ताधारी व विरोधकांना केली. संबंधित मंत्र्याने माफी मागितली आहे. पंतप्रधानांनी निवेदन दिले आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र बसून सोमवापर्यंत  तोडगा काढावा, अशी सूचना कुरियन यांनी केली. दरम्यान, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मोदी सरकारविरोधात काँग्रेसने निदर्शने केली. त्यानंतर विरोधकांनी ‘रघुपती राघव राजाराम..’ भजन म्हणून विरोधकांना सन्मती मिळण्यासाठी प्रार्थना म्हटली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा