नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारीही गोंधळाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. ‘नीट’सह स्पर्धात्मक परीक्षांतील घोळ, अग्निपथ योजना, महागाई या मुद्द्यांवर आक्रमक राहण्याचे संकेत विरोधकांनी दिले असताना आता सरकारही त्याचा तीव्रतेने प्रतिकार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांत वादळी चर्चेचा अंदाज आहे.
हेही वाचा >>> व्यंकय्या गारू : भारताच्या सेवेसाठी समर्पित जीवन
भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर चर्चेला सुरुवात करणार आहेत. या प्रस्तावाला बांसुरी स्वराज अनुमोदन देतील. आभार प्रस्तावावर चर्चेसाठी लोकसभेने १६ तास दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी चर्चेला उत्तर देतील. राज्यसभेत चर्चेसाठी २१ तास देण्यात आले असून पंतप्रधान बुधवारी उत्तर देण्याची शक्यता आहे. मात्र अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक असलेले विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्ना सुरू ठेवण्याची शक्यता आहे.
संविधान बचाव विरुद्ध आणीबाणी
विरोधकांनी संविधान बचावाचे हत्यार उपसले असताना त्याला सत्ताधाऱ्यांकडून आणीबाणीची आठवण करून देत प्रत्युत्तर देण्यात येत आहे. लोकसभाध्यक्षांनी मांडलेला प्रस्ताव आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून याचे स्पष्ट संकेत मिळाले असतानाच आता आभार प्रस्तावातही भाजप खासदारांकडून आणीबाणीचा मुद्दा उचलून धरला जाण्याची शक्यता आहे. तर ‘इंडिया’चे खासदार संविधान रक्षणावरून टीका सुरूच ठेवतील, असे मानले जात आहे.