काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत नरेंद्र मोदी तसेच उद्योगपती गौतम अदाणी यांच्यात संबंध आहेत. गौतमी अदाणी यांनी मागील २० वर्षांत भाजपाला अनेक रुपये दिले, असा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर केंद्रीय राजकारणात एकच खळबळ उडाली असून त्याचे पडसाद संसदेतही उमटत आहेत. मागील काही दिवसांपासून विरोधक याच मुद्द्याला घेऊन आक्रमक झाले आहेत. आजदेखील त्याचे पडसाद राज्यसभेत उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाला उभे राहिल्यानंतर विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. विरोधकांनी सभागृहात मोदी-अदाणी भाई भाई अशा घोषणा दिल्या.
मोदी-अदाणी भाई भाई, जी फॉर जेपीसी, म्हणत घोषणबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलण्यासाठी उभे राहिले होते. यावेळी मोदी यांनी भाषणाला सुरुवात करताच विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला. विरोधी बाकावरील राज्यसभा सदस्यांनी ‘मोदी-अदाणी भाई भाई, जी फॉर जेपीसी’ अशा घोषणा दिल्या. एकीकडे मोदी यांचे भाषण सुरू असताना विरोधकांनी या घोषणाबाजींनी सभागृह दणाणून सोडले. विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मोदी यांना भाषण करताना अडथळा निर्माण होत होता. मात्र तरीदेखील मोदी सभापतींना उद्देशून भाषण करत राहिले.
संयुक्त संसदीय समिती स्थापन करा, विरोधकांची मागणी
मोदी भाषणासाठी उभे राहिल्यानंतर विरोधकांनी भाषणबाजी बंद करा, अदाणी, एलआयसीवर बोला, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच गौतम अदाणी मुद्यावर संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) स्थापना करण्याचीही मागणी केली.
मोदी यांचा विरोधकांवर पलटवार
तर दुसरीकडे मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तुम्ही आमच्यावर कितीही चिखलफेक करा. मात्र आमचे कमळ फुलतच राहील, असे मोदी म्हणाले. तसेच “मागील तीन ते चार वर्षात साधारण ११ कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचलेले आहे. सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आम्ही जनधन योजनेद्वारे अनेक लोकांचे बँक खाते उघढले. मागील ९ वर्षात ४८ कोटी जनधन बँक खाते उघडण्यात आले,” अशी माहितीही मोदी यांनी दिली.