Opposition Meeting Bengaluru : आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला नमवण्यासाठी देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांची संयुक्त बैठक आज बंगळुरू येथे पार पडली. देशभरातील २६ पक्ष या बैठकीला हजर होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या फॉर्म्युलासह या पक्षाच्या आघाडीला नाव ठरवण्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आघाडीचं नाव जाहीर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ (INDIA) असे नाव देण्यात आले आहे. India या संक्षिप्त रुपाचा पूर्ण अर्थ Indian National Development Inclusive Alliance असा होतो.

विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा येथे आयोजित करण्यात आली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती. त्यावेळी पुढची बैठक जुलै महिन्यात होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार, काल सायंकाळपासून २६ पक्षातील नेते एकत्र आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि शरद पवारही सहभागी झाले. दरम्यान, या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटप, आघाडीचं नाव आणि आघाडीचं निमंत्रक ठरवण्यात येणार असल्याचं ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल (१७ जुलै) सांगितलं होतं. त्यानुसार, आजच्या बैठकीत हे नाव ठरवलं असल्याचं म्हटलं आहे.

पुढची बैठक मुंबईत

मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं की, विरोधकांची पहिली बैठक पाटणा येथे पार पडली. त्यानंतर आज दुसरी बैठक बंगळुरूत होत आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ची पुढची बैठक महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे होईल. आम्ही आता २६ पक्ष एकत्र आलो आहोत. आधीच्या बैठकीत २० पक्ष आले होते. पाटणा येथे येणं काही पक्षाच्या नेत्यांना शक्य झालं नव्हतं. त्यामुळे तेव्हा तिथे तुम्हाला कमी पक्ष दिसले. परंतु आता आम्ही २६ पक्ष एकत्र आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाचे धाबे दणाणले आहेत. आमची ही बैठक पाहून त्यांनी ३० पक्षांची बैठक बोलावली आहे.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आमची २६ पक्षांची एकजूट पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएची बैठक बोलावली आहे. यात त्यांनी ३० पक्षांना बोलावलं आहे. हे ३० पक्ष कुठले आहेत, तेच माहिती नाही. त्यांनी कोणाला बोलावलंय ते माहिती नाही. हे पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत की नाही तेसुद्धा कोणाला माहिती नाही. या पक्षांची नावंही कधी ऐकली नाहीत. ज्यांच्याशी मोदी याआधी कधी बोलत नव्हते त्यांनाही बैठकीसाठी बोलावलं आहे. मोदीजी आता प्रत्येक पक्षाशी संपर्क साधत आहेत. त्या त्या पक्षाच्या अध्यक्षांशी बोलत आहेत. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष वेगवेगळ्या राज्यात जाऊन तिथल्या स्थानिक पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत. कारण ते (नरेंद्र मोदी) आता विरोधकांना घाबरले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition parties alliance to be called india sgk
Show comments