आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विरोधकांनी काही महिने आधीपासूनच सत्ताधारी भाजपाच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली होती. २३ जून रोजी विरोधकांची बिहारच्या पाटणा येथे पहिली बैठक पार पडली. या बैठकीला देशातले १६ पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर काल आणि आज (१७, १८ जुलै) कर्नाटकच्या बंगळुरू येथे विरोधकांची दुसरी बैठक पार पडली. यावेळी देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र जमले होते. महाराष्ट्रातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, आजच्या बैठकीत विरोधकांच्या या आघाडीचं नाव ठरवण्यात आलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ (INDIA) असं नाव देण्यात आलं आहे. India या संक्षिप्त रुपाचा पूर्ण अर्थ (फुल फॉर्म) इंडियन नॅशनल डेवलपमेन्ट इन्क्लुझिव्ह अलायन्स (Indian National Development Inclusive Alliance) असं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबद्दलची माहिती बैठकीनंतर जाहीर केली.

दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं की, विरोधकांची पहिली बैठक पाटणा येथे पार पडली. त्यानंतर आज दुसरी बैठक बंगळुरूत होत आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ची पुढची बैठक महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे होईल. आम्ही आता २६ पक्ष एकत्र आलो आहोत. आधीच्या बैठकीत २० पक्ष आले होते. पाटणा येथे येणं काही पक्षाच्या नेत्यांना शक्य झालं नव्हतं. त्यामुळे तेव्हा तिथे तुम्हाला कमी पक्ष दिसले. परंतु आता आम्ही २६ पक्ष एकत्र आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाचे धाबे दणाणले आहेत. आमची ही बैठक पाहून त्यांनी ३० पक्षांची बैठक बोलावली आहे.

हे ही वाचा >> ब्रिजभूषण सिंह यांना दिलासा, कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आमची २६ पक्षांची एकजूट पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएची बैठक बोलावली आहे. यात त्यांनी ३० पक्षांना बोलावलं आहे. हे ३० पक्ष कुठले आहेत, तेच माहिती नाही. त्यांनी कोणाला बोलावलंय ते माहिती नाही. हे पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत की नाही तेसुद्धा कोणाला माहिती नाही. या पक्षांची नावंही कधी ऐकली नाहीत. ज्यांच्याशी मोदी याआधी कधी बोलत नव्हते त्यांनाही बैठकीसाठी बोलावलं आहे. मोदीजी आता प्रत्येक पक्षाशी संपर्क साधत आहेत. त्या त्या पक्षाच्या अध्यक्षांशी बोलत आहेत. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष वेगवेगळ्या राज्यात जाऊन तिथल्या स्थानिक पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत. कारण ते (नरेंद्र मोदी) आता विरोधकांना घाबरले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition parties india next meeting in mumbai says mallikarjun kharge asc
Show comments