उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची काल (शनिवारी, १५ एप्रिल) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. असदच्या एन्काऊंटरनंतर दोनच दिवसांनी हे हत्याकांड घडल्याने उत्तर प्रदेशातील या घडामोडी देशभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यावरून विरोधकांनीही उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरलं आहे. तर, याबाबत भाजपाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नसले तरीही एका भाजपाच्या नेत्याने विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. “पाप पुण्याचा हिशोब याच जन्मात होतो”, असं भाजपा नेत्याने म्हटलं आहे.
राज्यमंत्री स्वतंत्र देवसिंग यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी एका वाक्यात या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “पाप पुण्याचा हिशोब याच जन्मात होतो”, असं सूचक विधान त्यांनी ट्वीटद्वारे केलं आहे. मात्र, नंतर त्यांनी हे ट्वीट डिलिट केले.
आठवड्याभरात उत्तर प्रदेशात दोन वेळा गोळीबार झाला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधकांनी शरसंधान साधलं आहे. “HM चा अर्थ होम मिनिस्टर (गृहमंत्री) असा होत नाही, परंतु हेडलाइन मॅनिप्युलेटर होतो”, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयराम रमेश ट्वीटद्वारे केली आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही याप्रकरणी ट्वीट करून उत्तर प्रदेश सरकारवर आगपाखड केली आहे. “उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी शिगेला पोहोचली असून गुन्हेगारांचे मनोबल उंचावले गेले आहे. पोलिसांच्या कडक सुरक्षेतही गोळीबार करून एखाद्याची हत्या केली जाते, मग सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय? त्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून,काही लोक जाणीवपूर्वक असे वातावरण निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे”, असं ट्वीट करत त्यांनी उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
अतिकचा मुलगा असदचा एन्काऊंटर करण्यात आला तेव्हा एएमएएमआयचे खासदार अससुद्दीन ओवैसी यांनी योगी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली होती. जर चकमकीच घडवायच्या आहेत तर न्यायाव्यवस्था कशासाठी आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आता अतिक आणि त्याच्या भावाच्या हत्येनंतरही त्यांनी योगी सरकारला धारेवर धरलं आहे.
अतिक आणि त्याचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांच्या हातांना बेड्या होत्या. जेएसआरच्याही घोषणा झआल्या. दोघांही हत्या म्हणजे योगी सरकारच्या कायदा सुव्यवस्थेचे अपयश आहे. एन्काऊंटर राजवरून जल्लोष करणारेही या हत्येला जबाबदार आहेत. ज्या समाजात हत्या करणारे हिरो ठरतात त्या समाजात न्यायालय आणि न्यायव्यवस्थेचे काम काय? असा सवाल त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केल आहे.