काँग्रेसचे माजी नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. देशातील विरोधी पक्षातील नेते तपास यंत्रणा, सरकार आणि पोलिसांच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत, असा आरोप केला आहे. सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर धर्माचा वापर शस्त्र म्हणून करण्यात येत आहे. भारत हे एक याचं उत्तम उदाहरण आहे.
“भारतात सध्या ज्या पद्धतीने द्वेषाचं राजकारण केलं जात आहे, ते एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून केलं जात आहे. संबंधित लोकांवर पोलिसांकडूनही काहीही केली जात नाही. जे द्वेषपूर्ण भाषणे देतात त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने अशा लोकांना पुन्हा द्वेषपूर्ण भाषणं करायला प्रोत्साहन मिळत आहे,” असंही सिब्बल म्हणाले
पुढे त्यांनी सांगितलं की, देशातील बहुसंख्य लोकं घाबरले असून ते मानसिकदृष्ट्या खचले आहेत. समाजात पसरत असलेल्या द्वेषाबाबत काय करायचं? याचं उत्तरही त्यांना माहीत नाही, त्यामुळे हे लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. आम्हीही सतत अशाच भीतीमध्ये जगतो. आम्हाला ईडीची भीती वाटते, आम्हाला सीबीआयची भीती वाटते, आम्हाला सरकारची भीती वाटते, आम्हाला पोलिसांची भीती वाटते, आम्हाला प्रत्येकाची भीती वाटते. आमचा आता कोणावरही भरवसा राहिलेला नाही.” असंही सिब्बल म्हणाले.
हेही वाचा- भाजपा नेत्याच्या मुलाच्या रिसॉर्टजवळ आढळला तरुणीचा मृतदेह, विनयभंग झाल्याचा पीडितेच्या वडिलांचा आरोप
७४ वर्षीय कपिल सिब्बल यांनी यावेळी न्यायव्यवस्थेवरही टीकास्र सोडलं. गरीब माणसाकडे वकिलाला द्यायला पैसे नसतील, तर तो न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात येऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.