नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर निर्बंध आलेला नाही. नोटाबंदीमुळे शेतकरी आणि गरीबांचे हाल होत आहेत. दुसरीकडे दहशतवादी हल्लेही थांबू शकलेले नाहीत. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसल्याचे दिसते अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत तृणमूल काँग्रेस, डीएमके, राष्ट्रीय जनता दलाचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीनंतर विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या ६० वर्षात सध्या सर्वाधिक बेरोजगारी असल्याचे गांधींनी सांगितले. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. भ्रष्टाचार आणि काळा पैसाविरोधात हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले. पण प्रत्यक्षात भ्रष्टाचार आणि काळा पैसावर काहीच फरक पडला नाही. याऊलट काळा पैसा पांढरा करणारे दलाल तयार झाल्याचा दावा त्यांनी केला. ३० डिसेंबर जवळ येत आहे, पण अद्याप देशभरात सर्वत्र तीच परिस्थिती आहे. नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसल्याचा आरोप त्यांनी केला. नोटाबंदीमागचे नेमके कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर करावे आणि नोटाबंदींचा फटका बसलेल्यांसाठी ते काय करणार आहेत असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

शेतकरी आणि दुकानदारांकडे सामान खरेदीसाठी पैसे नाही. गोरगरीबांचेही हाल होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांना उद्योग समुहांकडून पैसे मिळाल्याचे समोर आले होते. सहारा समुहाकडून मोदींना ४० कोटी रुपये आणि बिर्ला समुहाकडून १२ कोटी रुपये मिळाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.