नवी दिल्ली : महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी दिला. इतकेच नव्हे तर, राज यांचा माफीनामा येत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांची भेट घेऊ नये, असा सल्लाही दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात अचानक आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण करू लागलेले राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले आहे; पण त्यांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपचे कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह यांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणि स्वपक्षाला अडचणीत आणले आहे.  महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते राज ठाकरे यांची पाठराखण करत असले तरी उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराने मात्र राज यांना आव्हान दिले आहे. ‘राज ठाकरे यांनी सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सार्वजनिकरीत्या हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, मगच अयोध्येत प्रवेश करावा,’ अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली.

ठाकरे कुटुंबावर टीका

राज्यात बाबरी मशिदीवरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यासंदर्भातही बृजभूषण सिंह यांनी ठाकरे कुटुंबावर टीका केली. ‘राम मंदिराच्या आंदोलनात ठाकरे कुटुंबाचा सहभाग नव्हता. राम मंदिर आंदोलन ते राम मंदिराचे बांधकाम या संपूर्ण संघर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद व सामान्य जनता सहभागी झाली होती. या आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही,’ असा दावाही बृजभूषण सिंह यांनी केला.

युतीत खोडा?        

महाराष्ट्रात भाजपने मशिदीचे भोंगे व हनुमान चालीसाच्या मुद्दय़ावरून राज ठाकरे यांना राजकीय पाठिंबा दिला असला तरी, त्याचे तीव्र पडसाद उत्तर भारतात उमटू लागले आहेत. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना पक्षाची शिस्त मोडून जाहीर विरोध केला आहे. बृजभूषण सिंह यांच्या विरोधाचा राज्यामधील भाजपच्या संभाव्य मनसे युतीवरही परिणाम होण्याची शक्यता मानली जात आहेत. भाजपने उघडपणे मनसेशी युती केली तर भाजपला पुढील वर्षी होणाऱ्या मध्य प्रदेश व राजस्थान या दोन मोठय़ा राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये नुकसान होऊ शकते, असेही मानले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition raj thackeray visit ayodhya bjp mp demands apology north indians ysh