गुजरातचे घमासान
‘ही विधानसभा निवडणूक ऐतिहासिक असून उत्तम प्रशासन आणि विकास या मुद्दय़ांवर ही निवडणूक लढवण्यात आली. सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष राज्यात सत्ता स्थापन करेल याची मला खात्री आहे’, असा आत्मविश्वास गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी मणिनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्या पत्नी श्वेता यांना उमेदवारी दिली आहे. मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी मुक्तसंवाद साधला. यंदाची निवडणूक आपल्यासाठी अनेकार्थाने ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, ‘यंदाची विधानसभा निवडणूक प्रथमच उत्तम प्रशासन आणि विकास या मुद्दय़ांवर लढवली जात आहे. तसेच थ्रीडी होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकाचवेळी अनेक ठिकाणी आपल्या प्रचारसभांचे सादरीकरण झाले. तसेच मोठय़ा संख्येने गुजराती मतदार मतदानासाठी बाहेर पडला आहे. या कारणांमुळे ही निवडणूक ऐतिहासिकच म्हटली पाहिजे’, असे मोदी म्हणाले. होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर जगात प्रथमच या निवडणुकीत करण्यात आला आहे. आपली बांधीलकी गुजरातच्या सहा कोटी जनतेशी आहे. त्यांची सेवा करण्याची संधी गेली दहा वर्षे मला प्राप्त झाली. आता सलग तिसऱ्यांदा निवडणूकजिंकून भाजप विजयाची ‘हॅट-ट्रिक’ साजरी करेल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. गुजराती जनतेची सेवा हीच देशसेवा असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. एवढय़ात तरी दिल्लीत जाण्याचा मनोदय नसल्याचेही मोदींनी स्पष्ट केले. विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी गुजराती जनता भाजपच्याच बाजूने उभी राहणार असल्याची खात्री असून भाजपला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र येत्या गुरुवारी, २० डिसेंबरला देशवासीयांना पहायला मिळेल असेही मोदींनी स्पष्ट केले.
गोळीबाराचे गालबोट
दरम्यान, गुजरातेतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला गोळीबाराचे गालबोट लागले.
पंचमहाल जिल्ह्य़ातील सहेरा येथील भाजपचे उमेदवार जेठा भरवाड यांच्यावर तारसंग या गावात दगडफेक झाली. भरवाड यांच्या अंगरक्षकांनी दगडफेक करणाऱ्यांवर गोळीबार केला. त्यात चारजण जखमी झाले. तारसंग हा काँग्रेसचे उमेदवार तख्तसिंह सोलंकी यांचा बालेकिल्ला असून त्यांनीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला. तर सोलंकी यांनी भरवाड गावात बोगस मतदान घडवून आणण्यासाठी आले होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठीच त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याचे सांगितले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा