नवी दिल्ली : काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीनंतर दोन दिवसांनी, मंगळवारी, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर या पाचही राज्यांतील ‘पराभूत’ प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. या गच्छंतीतून संघटनात्मक बदलाचे संकेत दिले गेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाच राज्यांमध्ये नामुष्कीजनक पराभवानंतर रविवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची साडेचार तास बैठक झाली होती. सोनिया गांधी यांना पक्षाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याची तसेच, आवश्यक संघटनात्मक बदल करण्याचीही विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पाचही प्रदेशाध्यक्षांना पायउतार होण्यास सांगण्यात आले असून या निर्णयाची माहिती प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीटद्वारे दिली.

उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय लल्लू व पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची ‘हकालपट्टी’ करण्यात आली आहे. या दोघांना स्वत:च्या मतदारसंघातही विजय मिळवता आलेला नाही. नवज्योतसिंह सिद्धू यांना आठ महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष केले गेले होते. पण, अंतर्गत मतभेदांमुळे पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. यशिवाय, उत्तराखंड, गोवा व मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष अनुक्रमे गणेश गोडियाल, गिरीश चोडणकर व एन. लोकेन सिंह यांनाही पद सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.

कार्यसमितीच्या बैठकीत बंडखोर जी-२३ गटातील गुलाम नबी आझाद व आनंद शर्मा यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर थेट टीका केली होती. या गटातील कपिल सिबल यांनीही, ‘सबकी काँग्रेस’ आता ‘घर की काँग्रेस’ झाली असल्याची टीका करत गांधी कुटंबाला पुन्हा लक्ष्य बनवले आहे. काँग्रेसवर चहुबाजूने होत असलेल्या टिकेनंतर काँग्रेस नेतृत्वाकडून ‘’हकालपट्टी’’चे आदेश दिले जाण्याची शक्यता मानली जात होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order resignation state presidents congress defeated signs sonia gandhi organizational change ysh