१६ नागरिकांचे बळी घेणाऱ्या हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या दोन अतिरेक्यांना न्यायालयात हजर करण्याबाबत दिल्ली न्यायालयाने बुधवारी पुन्हा पकड वॉरंट जारी केले.
जिल्हा न्या. आय. एस. मेहता यांनी सईद मकबूल आणि इमरान खान या दोघा आरोपींना हजर करण्याचे आदेश दिले आहेत. तिहार तुरुंगातील या दोन्ही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्याबाबत २५ फेब्रुवारी रोजी आदेश दिले होते. राष्ट्रीय सुरक्षा पथकाने या दोघांना ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती.
ऑगस्ट २०१२ मधील पुणे बॉम्बस्फोटप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने या दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. सध्या ते तिहार तुरुंगात आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या मते, मकबूल आणि इमरान यांनी जुलै २०१२मध्ये हैदराबादच्या दिलसुखनगरची रेकी केली होती. या भागात २१ फेब्रुवारी रोजी बॉम्बस्फोट झाले होते. इंडियन मुजाहिदीनचा पाकिस्तानस्थित म्होरक्या रियाज भटकल आणि त्याच्या साथीदारांच्या सहकार्याने हैदराबाद बॉम्बस्फोटाचा कट अमलात आणला होता. त्यामुळे हैदराबाद स्फोटाच्या पाश्र्वभूमीवर त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात देण्याची मागणी राष्ट्रीय सुरक्षा पथकाने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा