भुवनेश्वर : ओडिशातील एका सामाजिक-सांस्कृतिक संस्थेने कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथ यांचा म्हणजे देवस्थानचा असल्याचा दावा केला आहे. ब्रिटनमधून ऐतिहासिक पुरी मंदिरात तो परत आणण्यासाठी संघटनेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर, त्यांचे पुत्र चार्ल्स राजे बनले आहेत. परंपरेनुसार, १०५ कॅरेटचा हा अतिमूल्यवान हिरा त्यांच्या पत्नी क्वीन कन्सोर्ट कॅमिला यांच्याकडे जाईल.
पुरीस्थित श्री जगन्नाथ सेनेने राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात कोहिनूर हिरा हा पुरी येथील बाराव्या शतकातील मंदिरात परत आणण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
हेही वाचा >>> महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “असा प्रकल्प निसटलाच…”
श्री जगन्नाथ सेनेचे निमंत्रक प्रियदर्शन पटनायक यांनी निवेदनात नमूद केले, की कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथ यांचा आहे. आता तो इंग्लंडच्या राणीकडे आहे. कृपया आपण पंतप्रधानांना हा हिरा भारतात आणण्यासाठी पावले उचलण्याची विनंती करावी. कारण महाराजा रणजितसिंह यांनी कोहिनूर भगवान जगन्नाथास समर्पित केला होता. अफगाणिस्तानच्या नादिरशाहविरुद्धच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर पंजाबचे महाराजा रणजितसिंह यांनी भगवान जगन्नाथांना हा हिरा समर्पित केला होता, असा दावा पटनायक यांनी केला. इतिहासकार आणि संशोधक अनिल धीर यांनी सांगितले, की मात्र, त्यावेळी हा हिरा लगेच मंदिराला सुपूर्द करण्यात आला नाही आणि रणजितसिंह यांचा १८३९ मध्ये मृत्यू झाला आणि ब्रिटिशांनी दहा वर्षांनंतर हा हिरा जगन्नाथ देवस्थानला देण्यात आल्याचे ठाऊक असताना रणजितसिंह यांचे पुत्र मुलगा दुलीप सिंह यांच्याकडून जबरदस्तीने घेतला.
पटनायक म्हणाले, की त्यांनी या संदर्भात महाराणी एलिझाबेथ यांना एक पत्रही पाठवले होते, त्यानंतर १९ ऑक्टोबर २०१६ रोजी बकिंगहॅम पॅलेसकडून एक पत्र प्राप्त झाले आणि त्यात यासंदर्भात थेट ब्रिटन सरकारकडे मागणी करण्यास सांगितले गेले. या पत्रात असे नमूद केले होते, की, महाराणी अराजकीय असून, आपल्या मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. त्या पत्राची एक प्रत राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनासोबत जोडण्यात आली आहे. सहा वर्षे या मुद्दय़ावर मौन का राखले, असे विचारले असता पटनायक यांनी सांगितले, की त्यांना इंग्लंडला जाण्यासाठी व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे ते ब्रिटनच्या सरकारकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करू शकले नाहीत.
इतिहासकार धीर यांनी सांगितले, की श्री जगन्नाथ सेनेचा दावा रास्त आहे. मात्र, त्या हिऱ्याच्या वारसदार म्हणून महाराजा रणजितसिंह यांचे वंशज, पाकिस्तान, अफगाणिस्तानातही इतर अनेक दावेदार आहेत. महाराजा रणजितसिंह यांनी त्यांच्या मृत्युपत्रात लिहिले होते की त्यांनी भगवान जगन्नाथ यांना कोहिनूर हिरा समर्पित केला होता. हा दस्तऐवज ब्रिटिश सैन्याच्या अधिकाऱ्याने प्रमाणित केला होता, ज्याचा पुरावा दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागारात आहे. पुरीचे आमदार आणि भाजप नेते जयंत सारंगी यांनीही हे प्रकरण ओडिशा विधानसभेत मांडणार असल्याचे सांगितले.
हिरा इंग्लंडच्या महाराणीस समर्पित? : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने काही वर्षांपूर्वी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले होते, की सुमारे १७० वर्षांपूर्वी कोहिनूर हिरा लाहोरच्या महाराजांनी इंग्लंडच्या महाराणीला समर्पित केला होता. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात भारत सरकारची भूमिका अशी होती, की सुमारे २० कोटी डॉलर किमतीचा हा हिरा ब्रिटिश शासकांनी चोरला अथवा जबरदस्तीने घेतला नव्हता. पंजाबच्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी तो ‘ईस्ट इंडिया कंपनी’ला दिला होता. कोहिनूर हे जगातील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक मानले जाते. चौदाव्या शतकात दक्षिण भारतातील कोल्लूर कोळसा खाणीत तो सापडल्याचे मानले जाते.