दिल्लीत वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावरून माजी सैनिकाने आत्महत्या केल्याच्या मुद्द्यावरून सरकारला टीकेला सामोरे जावे लागत असतानाच केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांच्या वक्तव्याने या वादात आणखीनच भर पडली आहे. ‘वन रँक वन पेन्शन’ (ओआरओपी) योजनेतील नियमांतील त्रुटींविरोधात जंतर-मंतर येथे आंदोलन करीत असलेल्या रामकिशन गढेवाल या माजी सैनिकाने बुधवारी आत्महत्या केली होती. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे दिल्लीतील राजकारण प्रचंड तापले होते. मात्र, व्ही.के. सिंह यांनी वादग्रस्त विधान करून या वादात आणखीनच तेल ओतले. या सैनिकाच्या मानसिक आरोग्याची तपासणी व्हायला पाहिजे, असे मत व्ही.के. सिंह यांनी व्यक्त केले. या सैनिकाने आत्महत्या केली. त्याचे कारण कुणालाही माहित नाही. मात्र, त्यासाठी वन रँक वन पेन्शनचे कारण जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्या करताना त्यांच्या मनात काय सुरू होते, हे कुणालाही माहिती नाही. त्यामुळे सर्वप्रथम या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्याचे राजकारण करू नये, असे व्ही.के. सिंह यांनी म्हटले. सिंह यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले असून काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने सिंह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. व्ही.के. सिंह यांना लाज वाटायला पाहिजे. त्यांचा राष्ट्रपती आणि सैन्यप्रमुखांकडून असा दोनदा सन्मान झाला आहे. मात्र, ते केवळ शोभेचे सैनिक आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले. तर काँग्रेस नेते आरपीएन सिंह यांनी एक माजी लष्करप्रमुख अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित करतो, ही शरमेची बाब असल्याचे म्हटले.
केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या ओआरओपी योजनेप्रकरणी माजी सैनिक रामकिशन गढेवाल हे समाधानी नव्हते. ते सोमवारपासून सहकाऱ्यांसोबत आंदोलन करत होते. मंगळवारी ते केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेण्यासाठी जात होते, पण त्यापूर्वीच त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यांना तात्काळ राममनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. रामकिशन यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते, की मी माझा देश, मातृभूमी आणि जवानांसाठी बलिदान देत आहे. रामकिशन यांच्या मुलाशी त्यांचे आत्महत्येपूर्वी बोलणे झाले होते. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत मोदींच्या राज्यात जवान आणि शेतकरी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आणि राहुल गांधी, मनीष सिसोदिया यांना रुग्णालयात गढेवाल यांच्या नातेवाईकांशी भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. केजरीवाल यांच्या गाडय़ांचा ताफाही पोलिसांनी रोखला.