वन रँक वन पेन्शनच्या वादाचे अनेक परिणाम होऊ शकतात, पण आम्ही त्यावर काम करतोय, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वेच्छानिवृत्तीबाबत भ्रम पसरविले जात असून, पंधरा वर्षे नोकरी करणाऱ्या प्रत्येक जवानाला या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. दिल्ली-फरीदाबाद मेट्रोचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर फरीदाबाद येथे पंतप्रधानांनी सभा घेत हरियानाच्या विकासाबाबत आणि ओआरओपीविषयी स्पष्टीकरण दिले.
‘वन रँक वन पेन्शन’ हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. देशाच्या संरक्षणासाठी आयुष्य दिलेल्या जवानांचा मानसन्मान हा सरकारसाठी महत्त्वाचा आहे. ‘वन रँक वन पेन्शन’वर सरकार आपले काम करत आहे. सरकारने माजी सैनिकांना आश्वासनही दिले आहे. हवालदार, शिपाई, नायक अशा प्रत्येक स्तरावरील निवृत्त जवानाला वन रँक वन पेन्शनचा लाभ मिळेल, असे मोदींनी यावेळी सांगितले. देशाचा सर्वांगिण विकास हेच आमचे ध्येय आहे. जनतेचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. आधीच्या सरकारने अपूर्ण ठेवलेल्या कामावरून त्यांच्यावर टीका करून मी थांबणार नाही. अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची असून ते आम्ही पूर्ण करतोय.
दरम्यान, स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणा-या जवानांना वन रँक वन पेन्शनचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आता माजी सैनिकांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन निवृत्त जवान सतबिर सिंह यांनी केले.

Story img Loader