अल-कायदा या कट्टर दहशतवादी संघटनेचा माजी म्होरक्या ओसामा बिन लादेन हा एकेकाळी महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करत असल्याचे काही पुरावे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. लादेनने १९९३ साली एका भाषणादरम्यान आपल्या समर्थकांना गांधीजींनी ब्रिटीशांविरुद्ध दिलेल्या लढ्याचे अनुकरण करण्याचा सल्ला दिल्याची बाब एका ध्वनीफितीद्वारे उघडकीस आली आहे. यावेळी लादेनने त्याच्या समर्थकांना अमेरिकन वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. २००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर लादेनला कंदहार सोडून जावे लागले होते. लादेन या ठिकाणी १९९७ पासून वास्तव्याला असून तिथे दीड हजार टेप्स सापडल्या आहेत. यादरम्यान केलेल्या एका भाषणात लादेनने गांधीजींच्या लढ्यापासून प्रेरणा घेण्याचे आव्हान केले होते. गांधीजींनी ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार टाकत ब्रिटिशांना साम्राज्य खालसा करायला भाग पाडले. आपणही त्यांच्याप्रमाणेच अमेरिकेशी वागायला हवे’ असे लादेनने त्यावेळच्या भाषणात म्हटले होते. संबंधित टेप्सनुसार १९९६ पर्यंत लादेनने हिंसाचाराचा मार्ग अवलंबला नव्हता. मात्र, १९९६ मध्ये सुदानमधून तडीपार केल्यानंतर लादेनच्या विचारसरणीत बदल झाल्याचे सांगितले जाते. २०११ मध्ये पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अमेरिकन लष्कराने केलेल्या कारवाईत लादेन ठार झाला होता.

Story img Loader