लॉस एंजेलिस : सर्वाधिक १३ नामांकने मिळालेल्या ‘एमिलीया पॅरेझ’ या चित्रपटाला मागे सारून प्रथमच अत्यंत कमी खर्चात तयार झालेल्या ‘अनोरा’ने सर्व महत्त्वाच्या ऑस्कर पुरस्कारांवर आपले नाव कोरले. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, पटकथा, संकलन आणि सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटाने पटकाविले. यंदाच्या सोहळ्यात पहिल्यांदाच मानांकने मिळविणाऱ्या अनेक चित्रपटांची सरशी झाल्याचे दिसले.

गेल्या काही वर्षांत बड्या स्टुडिओजच्या अगडबंब खर्च झालेल्या नेत्रदीपक सिनेमांपेक्षा ‘इंडिपेण्डण्ट’ चित्रपटांचे वजन ऑस्करमध्ये वाढत आहे. यंदाही तेच चित्र दिसले. ‘अनोरा’ या चित्रपटासाठी शॉन बेकर यांच्या नावावर नवा इतिहास नोंदला गेला. एकाच व्यक्तीच्या नावाने एकाच सोहळ्यात सर्वाधिक चार पुरस्कार मिळविणाऱ्या वॉल्ट डिझ्ने यांच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी साधली. २००४ सालापासून समाजासाठी निषिद्ध आणि दुर्लक्षित विषयांवर चित्रपट बनविणाऱ्या बेकर यांच्या या चित्रपटाने सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांवर बाजी मारली.

मायकी मॅडिसन यांना ‘अनोरा’साठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर एड्रियन ब्रॉडी यांना ‘ब्रुटलिस्ट’ चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. ब्राझीलचा ‘आय अॅम स्टिल हिअर’ सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट ठरला. या गटात देखील फ्रान्स-जर्मनीमधून दाखल झालेल्या ‘एमिलीया पॅरेझ’ चित्रपटाला पुरस्कार मिळविता आला नाही.

निवड सदस्यांच्या अंतिम मतदानप्रक्रियेच्या काही दिवस आधी या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री कार्ला सोफिया गॅस्कन यांनी समाजमाध्यमांत पूर्वी केलेला अवमानजनक मजकूर नव्याने समोर आला. त्या वादामुळे चित्र बदलल्याचे बोलले जाते. या चित्रपटासाठी झोई साल्डाना यांना सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीसाठी आणि कॅमिली आणि क्लेमण्ट डुकॉल या संगीतकार द्वयीला ‘एल माल’ गाण्यासाठीचा पुरस्कार मिळाले. कैरन कल्किन यांना ‘ए रियल पेन’ चित्रपटासाठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘फ्लो’ हा सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट ठरला.

यंदा वेगळे काय?

’‘द सबस्टन्स’ या चित्रपटासाठी गेल्या दोन महिन्यांत बहुतांश पुरस्कार पटकाविणाऱ्या डेमी मूर यांना ऑस्करने मात्र हुलकावणी दिली. ‘ब्रुटलिस्ट’ आणि ‘विकिड’ या दोन्ही चित्रपटांना दहा नामांकने होती.

’त्यांना अनुक्रमे तीन आणि दोन पुरस्कारांवर समाधान मानावे लागले. परभाषिक चित्रपटापासून ते अ‍ॅनिमेशन आणि संकलन या गटांमध्ये पहिल्यांदा मानांकन मिळालेले कलाकार सरस ठरले.

Story img Loader