डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीला केंद्रातील काँग्रेस सरकारने मुद्दाम विलंब लावला, अशी टिप्पणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. गतवर्षी पाच डिसेंबरला इंदू मिलची जागा देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी केली होती. वर्षभरानंतरही त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. येत्या ५ डिसेंबरला प्रस्तावित स्मारकाच्या जागेचे भूमिपूजन न झाल्यास ६ डिसेंबरला आरपीय आपल्या पद्धतीने भूमिपूजन करील, असा इशारा आठवले यांनी केंद्र व राज्य सरकारला दिला.
इंदू मिलची जागा मिळाल्याचे श्रेय स्वत:कडे घेत आठवले म्हणाले की, आरपीआयने गतवर्षी आंदोलन केले म्हणून इंदू मिलची जागा मिळाली. याचे श्रेय आंबेडकरी चळवळीतल्या कोणत्याही पक्ष-संघटनेस देण्यास आठवले यांनी नकार दिला. बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रस्ताव काँग्रेस सरकारने मुद्दाम रोखला. वर्षभराचा कालावधी कोणतीही प्रक्रिया पूर्ण करण्यास पुरेसा असतो. पण काँग्रेसने आंबेडकरी जनतेच्या भावनेची कदर केली नाही. २५ नोव्हेंबरला कॅबिनेटने डॉ. भीमराव आंबेडकर स्मारक विधेयकात सुधारणा करण्यास अनुकूलता दर्शवल्यानंतर जलद कार्यवाही होण्याची गरज आहे. ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात हे विधेयक सरकारने मंजूर करवून घ्यावे. संसदेतील प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत किमान इंदू मिलवर भूमिपूजन व्हायलाच हवे, अशी आग्रही मागणी आठवले यांनी केली. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत चार ठिकाणी आरपीआयचे उमेदवार मैदानात आहेत. या मतदारसंघांचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी भाजपला समर्थन दिल्याचे आठवले म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा