Our ancestors discovered America: मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांनी एक अजब विधान केले आहे. मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, भारतीय खलाशांनी अमेरिकेचा शोध घेतला होता. तसेच प्रभू रामाची मूर्ती घडविणाऱ्या भारतीय वास्तुविशारदाच्या मदतीने बीजिंग शहराची रचना करण्यात आली आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वात आधी ऋग्वेद लिहिणाऱ्यांनीच सांगितले होते, असेही दावे इंदर सिंह परमार यांनी केले आहेत. बरकतुल्ला विद्यापीठातील दीक्षांत समारंभात राज्यपाल मंगूभाई सी. पटेल आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह उच्च शिक्षण मंत्री परम सिंह परमार हे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलत असताना परमार यांनी हे दावे केले आहेत.
हे वाचा >> Vasco da Gama: ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?
परमार पुढे म्हणाले की, इतिहासकारांनी पद्धतशीरपणे भारताच्या शक्तीस्थळांचा अनुल्लेख केला. त्यामुळे भारताची जगभरात चुकीची आणि नकारात्मक प्रतिमा तयार झाली. आपले पूर्वज ज्ञान, कौशल्य आणि क्षमता याबाबतीत प्रगत होते. आपण स्वतःला न्यूनगंडातून मुक्त केले पाहीजे आणि चांगले विचार आत्मसात करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहीजे.
अमेरिकेच्या शोधाबाबत बोलताना परमार म्हणाले की, एक भारतीय खलाशी आठव्या शतकात अमेरिकेत गेला आणि सॅन दिएगोयेथे त्याने अनेक मंदिरे बांधली. याची नोंद आताही तेथील संग्रहालय आणि ग्रंथालयात जतन करून ठेवली गेली आहे. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला हे जर भारतीय विद्यार्थ्यांना शिकवले जाणार असेल तर कोलंबसच्या नंतर जे जे लोक अमेरिकेत गेले, त्यांनी तेथील प्राचीन लोकांबरोबर काय काय केले, याचीही शिकवण दिली गेली पाहीजे. तेथील निसर्ग उपासक आणि सूर्यपूजक असलेल्या समाजाचा नाश केला गेला. त्यांची कत्तल करून धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले, हेदेखील विद्यार्थ्यांना सांगितले गेले पाहीजे.
“आमच्या पूर्वजांनी जेव्हा अमेरिकेचा शोध लावला, तेव्हा तेथील संस्कृतीमध्ये आणखी भर घालण्याचे काम आपण केले. ‘माया’ सभ्यतेबद्दल आणि माय संस्कृतीच्या तत्त्वज्ञानाबद्दल भारतीय विद्यार्थ्यांना शिकवायला हवे. जर आपण शिक्षण देत असू तर ते अचूक असायला हवे. अमेरिकेचा शोध कोलंबसने नाही तर आपल्या पूर्वजांनी लावला, हे विद्यार्थ्यांना शिकवले गेले पाहीजे”, असेही शिक्षण मंत्री परमार म्हणाले.
वास्को द गामाने भारताचा शोध लावला नाही
वास्को द गामाने लिहून ठेवल्यानुसार, त्याच्या जहाजापेक्षाही चंदन नावाच्या भारतीय व्यापाऱ्याचे जहाज चार पट मोठे होते. चंदनच्या जहाजाचा पाठलाग करत करत वास्को द गामा भारताच्या समुद्रकिनारी पोहोचला होता. वास्को द गामाने भारतापर्यंत पोहोचणाऱ्या समुद्रमार्गाचा आणि भारताचा शोध लावला, असा चुकीचा इतिहास आपल्या इतिहासकारांनी विद्यार्थ्यांना शिकवला असल्याचा दावाही मंत्री परमार यांनी केला.
बीजिंगची रचना भारतीय वास्तूविशारदाची
परमार पुढे असेही म्हणाले की, बुद्ध आणि प्रभू रामाची मूर्ती घडविणारे शिल्पकार बाल बाहू यानेच चीनमधील बीजिंग शहराची रचना केली. त्याचे काम पाहून चीनने त्याला या कामासाठी बोलावून घेतले होते. आजही बीजिंग सरकारने उभारलेला बाल बाहूचा पुतळा तिथे आहे, असाही दावा त्यांनी केला.