Rahul Gandhi to Anna’s parents: अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सनदी लेखाकार (सीए) तरुणी ॲना सेबास्टियन पेरायिल (वय २६) हीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला होता. त्यानंतर देशभरात कामाच्या ठिकाणी ताण वाढला असल्याबाबत चर्चा सुरू झाली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतेच ॲना पेरायिलच्या पालकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. राहुल गांधी यांनी याचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे. ते म्हणाले, “मी ॲनाच्या पालकांशी बोलून त्यांचे सांत्वन केले. अतिशय हुशार आणि महत्वाकांक्षी असलेल्या मुलीचा कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरणामुळे मृत्यू झाला, ही अतिशय दुःखद बाब आहे.”

भारतातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अतिताणाचा सामना करावा लागू नये आणि कार्यालयीन वातावरणात सुधारणा व्हावी, यासाठी मी लढा देणार असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. हा विषय संसदेत मांडणार असल्याचेही राहुल गांधी यांनी ॲनाच्या पालकांना सांगितले. तसेच आपल्या मुलीच्या निधनाचे दुःख बाजूला सारून कामाच्या ठिकाणचे वातावरण सुधारावे, यासाठी ॲनाच्या आईने धैर्य आणि निस्वार्थीपणा दाखवला, याबद्दल राहुल गांधी यांनी त्यांचे कौतुक केले.

हे वाचा >> EY Employee Death : कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या ॲनाच्या वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ती रात्री साडेबारापर्यंत…”

व्हिडीओ कॉलवर राहुल गांधी यांनी ॲनाच्या पालकांना पहिला प्रश्न विचारला की, ईवायमध्ये कामाच्या ठिकाणचे वातावरण कसे होते? तिथे खूप तणाव होता का? नेमके काय झाले? यावर उत्तर देताना ॲनाची आई म्हणाली की, माझी मुलगी नेहमी सांगायची की, तिला अनेक तास काम करावे लागत आहे. रात्र असो, शनिवार-रविवार असो ती कामच करत राहायची. तिला तिच्या वैयक्तिक गरजांसाठीही वेळ मिळायचा नाही.

माझी मुलगी मला रोज रात्री मला फोन करून सांगायची की आता फोनवर बोलायचीही ताकद उरलेली नाही. एवढी ती थकायची. जेव्हा ती कार्यालयातून घरी परत यायची, तेव्हा ती थेट बेडवर पडायची. आपल्या मुलांचा अक्षरशः छळ होत होता, त्यांच्याकडून गुलामासारखे काम करून घेण्यात येते, असाही आरोप आईने केला.

भारत स्वतंत्र झाला, पण आपली मुले अजूनही गुलाम

ॲनाच्या आईने पुढे म्हटले की, राहुलजी, मला सांगायचे आहे की, भारतातच आपल्या मुलांना अशी गुलामांसारखी वागणूक का मिळावी. विदेशात अशाप्रकारे कुणी काम करायला सांगू शकते का? भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, पण आपल्या मुलांना आजही स्वातंत्र्य मिळालेले नाही, ते गुलामांसारखे काम करत आहेत. मुले इतकी मेहनत घेऊन अभ्यास करतात, पदव्या मिळवतात आणि त्यानंतर पुढे जाऊन त्यांना अशाप्रकारे गुलामी करावी लागत आहे. आपल्या मुलांना या त्रासातून का जावे लागत आहे?

हे ही वाचा >> “मीसुद्धा २० तास काम करायचो”, ईवाय कंपनीतील तरुणीच्या मृत्यूनंतर इतर कंपन्यांमधील माजी कर्मचाऱ्यांनी सांगितला अनुभव!

यावर राहुल गांधी यांनी पालकांचे सांत्वन करत हा मुद्दा संसदेत उपस्थित करु, असे आश्वासन दिले.

ॲनाचा मृत्यू कसा झाला?

ईवायच्या पुणे कार्यालयात ॲना यंदा १८ मार्चला रुजू झाली होती. तिचा २० जुलैला मृत्यू झाला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजते. तिची आई अनिता ऑगस्टिन यांनी याबाबत एक सविस्तर ई-मेल ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना पाठविला होता. तो समाजमाध्यमांत व्हायरल झाला होता. त्यात ॲनाचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. याचबरोबर ॲनाच्या अंत्यसंस्काराला कंपनीतील एकही व्यक्ती उपस्थित राहिली नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. सोशल मीडियावर ही बाब पसरल्यानंतर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. अनेक नेटिझन्सने कंपनीविरोधात कायदेशीर लढा देण्याचे सूचित केले आहे.

Story img Loader