Indrajeet Saroj Statement on Indian Gods : मुहम्मद घोरी आणि मुहम्मद बिन कासीम यांनी केलेल्या आक्रमणादरम्यान भारतीय देवी-देवता कुठे होत्या? असा प्रश्न विचारत समाजवादी पक्षाचे आमदार इंद्रजीत सरोज यांनी नवा वाद निर्माण केला आहे. देशातील देवी-देवतांनी आक्रमकांना शाप देऊन त्यांची राख करायला हवी होती, असंही ते म्हणाले. ते एएनआयशी बोलत होते.

“इ.स. ७१२ मध्ये, मुहम्मद बिन कासीम अरबस्तानातून या देशात आला आणि त्याने देश लुटला. मुहम्मद गझनवी अफगाणिस्तानीतून चाल करत आला आणि सोमनाथ मंदिरावर १७ वेळा आक्रमण केले. मग मुहम्मद घोरी या देशात लुटण्यासाठी आला. मुहम्मद घोरी हा पहिला मुस्लिम शासक होता जो देश लुटायला आला होता तर, या देशातील देव-देवतांनी तेव्हा काय केले? त्यांना शाप देऊन त्यांची राख का केली नाही? ते आंधळे-बहिरे लुळे-पांगळे झाले असते. याचा अर्थ असा की काहीतरी कमतरता आहे आणि आपले देव-देवता इतके शक्तिशाली नाहीत”, असे समाजवादी पक्षाचे आमदार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आपल्या देशातील पीडित आणि दलित बांधवांसाठी देव आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाच मानलं पाहिजे.

अखिलेश यादव काय म्हणाले?

“मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही. पण इतिहासाशी संबंधित कोणीही प्रश्न उपस्थित करू नये. लोक आता इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. इतिहासातून आपल्याला काही शिकता येत नसेल तर तो इतिहासच राहू द्यात. त्यावर चर्चा करू नये”, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिली.