महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांमुळे आमची मान शरमेने खाली गेली असल्याची भावना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सोनिया गांधी यांनी महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी गंभीर उपाय योजले गेले पाहिजेत, याचा पुनरुच्चार केला. दिल्लीतील भगत फूलसिंग महिला विद्यापीठाच्या पदवी प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
स्त्रीभ्रूण हत्या, बलात्कार, विनयभंग हे प्रकार म्हणजे भारतीय समाजाला लागलेला कलंक असून, ते मुळापासून उखडून टाकले गेले पाहिजेत, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. महिलांवरील शारीरिक अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. राजधानी दिल्ली तसेच देशातील इतर सर्वच शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात बलात्काराची प्रकरणे सातत्याने पुढे येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी महिलांवरील अत्याचार कायमचे थांबले पाहिजेत, असे म्हटले आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने अनेक उपाय योजले आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे विधेयक लवकरच संसदेत मंजूर होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महिलांसाठीच्या सार्वजनिक क्षेत्रातील पहिल्या बॅंकेसाठी आणि निर्भया निधीसाठी प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा