महिनाभराच्या धामघधुमीनंतर अखेर कर्नाटकात काल (१० मे) मतदान प्रक्रिया पार पडली. तिथे ७२ टक्के मतदान झाले असून हे आतापर्यंतचं सर्वाधिक मतदान असल्याचं बोललं जातंय. मतदानानंतर एक्झिट पोलचेही अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या बाजूने निकाल जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आमचीच (भाजपाची) सत्ता सत्तेवर राहिल असा विश्वास व्यक्त केला आहे. एक्झिट पोलचे अंदाज बसवराज बोम्मई यांनी फेटाळून लावला आहे.

“आम्हाला शंभर टक्के बहुमत मिळेल. कर्नाटकात ७२ टक्के मतदान झालं आहे. मागच्या मतदानांच्या तुलनेत हे अधिक आहे”, असं बसवराज बोम्मई म्हणाले. “एक्झिट पोल हे एक्झिट पोल असतात. ते शंभर टक्के बरोबर असू शकत नाहीत. सर्व एक्झिट पोलमध्ये कमी किंवा जास्त ५ टक्के खरे अंदाज असतात. त्यामुळे संपूर्ण परिस्थिती बदलू शकते”, असंही बोम्मई म्हणाले.

“यंदा कर्नाटकात चांगले मतदान झाले आहे. याचा फायदा भाजपालाच होईल”, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. “जेवढे जास्त मतदार येतात ते काँग्रेससाठी नाही तर भाजपासाठी केव्हाही चांगले असते. शहरी भागात मतदान न करणारे बरेच मतदार समोर आले आणि त्यांनी मतदान केलं आहे. हे भाजपासाठी सकारात्मक लक्षण आहे”, असंही ते म्हणाले.

किती टक्के मतदान झाले?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ७२ टक्के मतदान झाले. विधानसभेच्या २२४ जागांसाठी पार पडलेल्या मतदानात रामनगर येथे सर्वाधिक ७८.२२ टक्के मतदान झाले होते. बंगळूरु शहरमध्ये ४८.६३ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

काय आहेत एक्झिट पोलचे अंदाज?

झी न्यूज आणि मॅट्राईजच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा : ७९ – ९४
काँग्रेस : १०३ – ११८
जेडीएस : २५ – ३३
अन्य : २-५

टीव्ही ९ भारतवर्ष आणि पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा : ८८ – ९८
काँग्रेस : ९९ – १०९
जेडीएस : २१ – २६
अन्य : ० – ४

हेही वाचा – विश्लेषण : कर्नाटकात जातींच्या समीकरणावरच निकालाचे गणित? कोणत्या जाती कुठे प्रभावी?

रिपब्लिक टीव्ही- पीएमएआरक्यू एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा : ८५ – १००
काँग्रेस : ९४ – १०८
जेडीएस : २४ – ३२
अन्य : २ – ६

सूवर्ण न्यूज-जन की बात एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा : ९४ – ११७
काँग्रेस : ९१ – १०६
जेडीएस : १४ – २४
अन्य : ० – २

न्यूज नेशन-सीसीएस एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा : ११४
काँग्रेस : ८६
जेडीएस : २१
अन्य : ३

सी-वोटर्सच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा : ८३ – ९५
काँग्रेस : १०० – ११२
जेडीएस : २१ – २९
अन्य : २ – ६