अधिकाधिक हिंदूंना संघटित करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट आहे. केवळ भाषणबाजी करून हिंदू संघटन होणे अशक्य आहे. त्यासाठी संघाचा विस्तार होणे गरजेचे आहे, असे परखड मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे व्यक्त केले.  संघाच्या ‘राष्ट्र रक्षा संगम’ या चार दिवसीय बैठकीला येथे सुरुवात झाली, त्यावेळी सरसंघचालक बोलत होते.
दिल्ली निवडणुकीत भाजपला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाच्या पाश्र्वभूमीवर संघाच्या सुरू झालेल्या या बैठकीत भागवत पुढे म्हणाले की, लोकांना संघाकडून खूप अपेक्षा आहेत. लोकांच्या या अपेक्षांची पूर्तता करण्याची वेळ आली असून संघाचा विस्तार गरजेचा आहे. कोण कोणत्या धर्माचा, जातीचा, वंशाचा आहे, याचा विचार न करता सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे असून संघ त्या दृष्टीने पावले टाकत आहे. संघटन कार्यक्रम ही आमची ताकद आहे. मात्र, ज्यांच्याकडे सामथ्र्य नसते त्यांना ते दाखवण्याची गरज वाटते. संघ स्वत:च्या ताकदीवर पुढे जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हिंदू समाजाला निर्भीड, स्वावलंबी बनवणे व त्यातून देशासाठी बलिदानाला तयार होणारे नागरिक घडवणे हे संघाचे काम आहे. मात्र त्यासाठी कृतीची गरज आहे. केवळ भाषण देऊन काही साध्य होणार नाही.
 – मोहन भागवत