गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू आहे. यांच्या संघर्षात भारताने द्विपक्षीय धोरण स्वीकारले आहे. याबाबत राहुल गांधींना अमेरिकेत प्रश्न विचारण्यात आला. यावर राहुल गांधी यांनी भारतातील केंद्र सरकाराने स्वीकारलेल्या धोरणाला समर्थन दर्शवले आहे. राहुल गांधी सहा दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आज ते अमेरिकेच्या राजधीनीतील थिंक टँक समुदाय आणि पत्रकारांशी संवाद साधत होते.
“आमचे रशियाशी संबंध आहेत. त्यांच्यावर आमची काही अवलंबित्वे आहेत. त्यामुळे माझी भारत सरकारसारखीच भूमिका असेल. शेवटी आम्हाला आमच्या हितसंबंधांचाही विचार करावा लागेल”, असं राहुल गांधी म्हणाले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध महत्त्वाचे असल्याचेही गांधींनी नमूद केले. “संरक्षण संबंध असणे महत्वाचे आहे. परंतु मला वाटते की आपण इतर क्षेत्रांचा (सहकाराचा) विचार केला पाहिजे,” असंही ते पुढे म्हणाले. यावेळी गांधींनी भारतातील प्रेस आणि धार्मिक स्वातंत्र्य, अल्पसंख्याकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि अर्थव्यवस्थेची स्थिती यासह अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
भारतात विरोधकांची एकजूट होत असल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले की, “भारतात खूप चांगल्या पद्धतीने विरोधक एकत्र येत आहेत. ते अधिकाधिक एक होत आहेत. आम्ही सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करत आहोत. मला वाटते की तेथे बरेच चांगले काम होत आहे. ही एक गुंतागुंतीची चर्चा आहे, कारण अशा काही जागा आहेत जिथे आपण विरोधी पक्षांशी स्पर्धा करत आहोत. त्यामुळे थोडे देणे आणि घेणे आवश्यक आहे. पण मला विश्वास आहे भाजपाविरोधातील आघाडी होऊ शकेल” असंही ते म्हणाले.