पर्यावरण मंत्रालयाचा कारभार पाहताना त्या खात्याच्या माजी मंत्री जयंती नटराजन यांनी तब्बल ३५० फायली रोखून धरल्या होत्या, अशी माहिती आता पुढे आली आहे. पर्यावरण मंत्री वीरप्पा मोईली यांनी पर्यावरण भवनातून आपल्या कामकाजास सुरुवात केली. त्यावेळी आधीच्या मंत्र्यांनी ३५० फायली रोखून धरल्याचे लक्षात आले.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर २२ ते २४ या दरम्यान जयंती नटराजन यांच्या निवासस्थानातून १८० फायली विनास्वाक्षरी परत पाठविण्यात आल्या होत्या. ११९ फायलींवर मंत्र्यांनी स्वाक्षरी केली असली, तरी विविध कारणांमुळे त्या मंत्रालयानेच रोखून धरल्या होत्या. तर ५० फायली या त्यांच्या मंत्रालयातील अधिकाऱयांनी रोखून धरल्या होत्या.
जयंती नटराजन यांच्या कार्यकाळात रोखून धरण्यात आलेल्या वरील फायलींपैकी जवळपास २८ फायली २०१२ मध्ये त्यांच्याकडे पाठविण्यात आल्या होत्या. मोईली यांनी या मंत्रालयाचा कारभार बघण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी मंत्रालयाशी संबंधित सर्वांना लेखी आदेश पाठवून जयंती नटराजन यांच्याकाळात मंत्रालयाकडे आलेल्या फायलीची सद्यस्थिती काय आहे, याची विचारणा केली. अधिकाऱयांनी यासंदर्भात मंत्रालयाकडे पाठविलेल्या माहितीच्या आधारे नटराजन यांच्या कार्यकाळात किती फायली रोखून धरण्यात आल्या होत्या, याची माहिती मिळाली.

Story img Loader