पंजाब नॅशनल बँकेत गैरव्यवहार करून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपती मेहुल चोक्सीला डोमिनिका कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्याला उपचारासाठी अँटीग्वाला जाण्याची परवानगी मिळाली होती. कोर्टात ऑनलाइन सुनावणीवेळी मेहुल चोक्सी रुग्णालयातील बेडवर झोपलेल्या अवस्थेत हजर झाला होता. यावेळी कोर्टानं त्याला उपचारासाठी अँटिग्वाला जाण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, जामीन मिळाल्यानतंर चोक्सी पुन्हा अँटिग्वात दाखल झाला आहे. त्यामुळे मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची संधी हुकली?, असल्याची चर्चा आहे.
कॅरेबियन देशातून चोक्सीला परत आणण्याच्या भारतीय प्रयत्नांना मोठा धक्का बसला असताना डोमिनिका हायकोर्टाचे न्यायाधीश बर्नी स्टीफनसन यांनी या मेहुल चोक्सीला अँटिगा आणि बार्बुडा येथे परत जाण्याची परवानगी दिली. तेथे चोक्सी माउंट सेंट जॉनच्या न्यूरोलॉजिस्ट हेडन ओसबॉर्नचा वैद्यकीय सल्ला घेईल. चोक्सी २०१८ पासून अँटिगा आणि बार्बुडाचे नागरिक म्हणून राहत आहेत. अँटिग्वामध्ये मेहुल चोक्सीला नागरिक म्हणून कायदेशीर आणि घटनात्मक संरक्षण लाभलेलं आहे. त्यामुळे त्याला परत भारतात आणण्याच्या आशेवर पाणी फिरल्याचे चित्र आहे.
मेहुल चोक्सी अँटिग्वात दाखल
डोमिनिकात २३ मे रोजी अवैधरित्या प्रवेश केल्याने मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मेहुल चोक्सी प्रकरणी डोमिनिका कोर्टात सुनावणी झाली होती. तेव्हा तब्येतीचं कारण देत तो कोर्टात गैरहजर राहीला होता. त्याचबरोबर मागच्या सुनावणीवेळीही तो रुग्णालयातून हजर राहिला होता. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला डोमिनिकातून भारतात आणण्यासाठी विविध यंत्रणांचे पथक तिथे गेले होते. मात्र जवळपास एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर चोक्सी याला न घेताच परतले होते. आता मेहुल चोक्सी जामीन मिळाल्यानंतर अँटिग्वात दाखल झाला आहे. मेहुलवर सध्या डोमिनिकाच्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळाला होता
चोक्सी व नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला १३५०० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात गंडा घातला होता. चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळाला होता. आता ईडीने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची १८ हजार १७० कोटींची संपत्ती संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत १८ हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. या संपत्तीपैकी ९ हजार ३७१.१७ कोटींची संपत्ती कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.