महाराष्ट्र सदनातील शिवसेना खासदारांच्या कृत्यावरून बुधवारी संसदेत प्रचंड गदारोळ झाला. या मुद्दय़ावरून विरोधक आक्रमक झाले असतानाच भाजपच्या एका खासदाराने केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्यावरून झालेली हमरीतुमरी यांनी या प्रकरणातील तणाव अधिक वाढवला.
लोकसभेत शून्य प्रहरात काँग्रेसच्या शहनवाझ यांनी शिवसेना खासदारांनी महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱ्याचा जबरदस्तीने ‘रोजा’ मोडल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. काँग्रेस, राजद, सप सदस्यांनी सेनेविरोधात घोषणाबाजी सुरू केली. सेना खासदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यावर सेना खासदारांनी हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्री अनंत गीते या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, रमजानचा महिना अत्यंत पवित्र असतो. ज्यांना रमजानविषयी सन्मान आहे त्यांनी सभागृहात खोटे बोलू नये. गीते यांच्या अवघ्या दोन वाक्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी गहजब केला. गीते असंसदीय शब्द वापरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याच वेळी रमेश बिधुडी ‘हा हिंदुस्थान आहे, इथे राहायचे असेल तर राहा; अन्यथा ..ला जा’, असे म्हणत ओवेसी यांच्या अंगावर धावून जाऊ लागले. भाजपच्या नाना पटोले यांच्यासह इतर सदस्यांनी त्यांना रोखून धरले. तिकडे विरोधी बाकांवरून ओवेसीदेखील वेलमध्ये दाखल झाले. त्यांना भाजपचे किरीट सोमय्या यांनी आवरण्याचा प्रयत्न केला. गीते यांचे वक्तव्य व बिधुडी यांच्या वर्तनामुळे विरोधकांच्या संतापात भर पडली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह समस्त सभागृह या प्रकाराने अवाक्  झाले. महाजन यांनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर दोन्ही सदस्यांनी या प्रकाराची माफी मागितली, तर संसदीय व्यवहारमंत्री व्यंकय्या नायडू यांनी बिधुडी यांच्या वर्तनावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मात्र, महाराष्ट्र सदनातील प्रकाराबाबत सरकारने सावध भूमिका घेतली. ‘महाराष्ट्र सदनातील प्रकार गंभीर व संवेदनशील आहे. तो खरा आहे अथवा नाही हे कुणालाही माहीत नाही. सर्वानी धार्मिक भावनांना आवर घातला पाहिजे. खरोखरीच असे काही झाले आहे किंवा नाही, हेदेखील कुणाला माहिती नाही,’ असे ते म्हणाले. मात्र, विरोधकांचे यावर समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला.

Story img Loader