blasts near cemetery in iran : इराणमधील करमान शहराच्या सिलसिलेवार येथे दोन लागोपाठ बॉम्बस्फोट झाल्यामुळे हाहाकार उडाला. या स्फोटात १०० हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याचे कळत आहे. जनरल कासीम सुलेमानी यांच्या समाधीस्थळावर एक कार्यक्रम सुरू असताना हे स्फोट झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला होता, असे सांगितले जात आहे. कासीम सुलेमानी यांचा २०२० साली अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता. इराणच्या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, जनरल सुलेमानी यांच्या समाधीस्थळी स्मृतीदिन साजरा करण्यासाठी असंख्य नागरिक येत असतात. याहीवर्षी अनेकजण येथे जमले असताना लागोपाठ दोन बॉम्बस्फोट झाले.

इराणच्या आपत्कालीन सेवा यंत्रणेचे प्रवक्ते बाबक येक्तपरस्त यांनी माहिती देताना सांगितले की, याठिकाणी ७३ हून अधिक लोक मृत्यूमुखी पडल्याची आमची माहिती आहे. तर १७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बाबक यांच्या प्रतिक्रियेनंतर सरकारी वृत्तवाहिनीने १०० हून अधिक नागरिक मारले गेले असल्याचे सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.

इराणी प्रसारमाध्यमांनी या बॉम्बस्फोटानंतरची भीषण परिस्थिती दाखविली आहे. प्रसारमाध्यमांच्या व्हिडिओमध्ये रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडलेला दिसत आहे. काही लोक जखमींना रुग्णवाहिकेत टाकून उपचारासाठी नेत आहेत. तर बाकीचे लोक घटनास्थळावरून सैरवैरा पळताना दिसत आहेत.

करमान रेड क्रिसेंट सोसायटीचे प्रमुख रझा फल्लाह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही सर्व सुरक्षेचे उपाय योजले होते, तरीही बॉम्बस्फोट झाले. स्फोट झाले, तेव्हा एक मोठा आवाज ऐकू आला. तो आवाज अतिशय भयानक होता. आम्ही या हल्ल्याचा तपास करत आहोत.