तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.८ मॅग्निट्युड इतकी होती. या भूकंपाचं केंद्र तुर्कस्तानमधल्या गाझियान्टेप शहराजवळ असल्याचं सांगितलं जात आहे. या भूकंपाने तूर्कस्तानात मोठा विध्वंस केला आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून यामध्ये १,००० हून अधिक लोकांचा बळी गेला असल्याची माहिती मिळाली आहे. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.१ किलोमीटर खोलीवर झाला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ४.१७ वाजता या परिसरात भूकंपाचे हादरे बसले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यूएस जियोलॉजिकल सर्वेने सांगितलं की, भूकंपाचं प्रमुख केंद्र हे गाझियान्टेप या शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर तर नूर्दगी शहरापासून २६ किमी अंतरावर होतं. भूकंपाचे धक्के लेबनान आणि सीरियामध्ये देखील बसले आहेत. तिथल्या माध्यमांनी माहिती दिली आहे की, उत्तर सीरियातल्या अलेप्पो आणि हमा या शहरांमध्ये भूकंपामुळे अनेक इमारती कोसलळल्या आहेत.

दी इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपामुळे आतापर्यंत १,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत एनडीआरएफच्या दोन टीम पाठवणार

तुर्कस्तानमध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भूंकपग्रस्त भागात बचावकार्य सुरू असून आता भारत तूर्कस्तानच्या मदतीसाठी पुढे आला आहे. बचावकार्यासाठी भारत NDRF च्या दोन टीम तूर्कस्तानला पाठवणार आहे. शोहमोहीम आणि बचावकार्यासाठी भारत रीलिफ मटेरियल देखील पाठवणार आहे.

तुर्कस्तानात दिवसभरात दुसरा भूकंप

तुर्कस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. दिवसभरातला हा दुसरा भूकंप आहे. या भूकंपाची तीव्रता ७.६ मॅग्निट्युड इतकी होती. कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात हे धक्के बसले. यामुळे तुर्कस्तानमध्ये पुन्हा हाहाकार उडाला आहे.

सीरियात मोठा विध्वंस

तूर्कस्तानाप्रमाणे सीरियामध्ये देखील भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे. अलेप्पो आणि हमा शहरांमधल्या अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. लोक पहाटेच्या साखरझोपेत असताना हा भूकंप झाला. सीरियन सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात भूकंपामुळे आतापर्यंत ४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींची संख्या ५१६ इतकी झाली आहे.

अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के

तूर्कस्तानशिवाय सायप्रस, ग्रीस, जॉर्डन, लेबनान, सीरिया, इराक, जॉर्जिया आणि अर्मेनिया या देशांमध्ये देखील भूकंपाचे हादरे बसले आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या देशांमधील भूकंपाचे फोटो व्हायरल होत आहेत. तूर्कस्तानात मोठा विध्वंस झाला असल्याचं बोललं जात आहे. अनेक देशांमध्ये स्थानिक प्रशासनांनी भूकंपानंतर बचाव मोहिमा हाती घेतल्या आहेत.

हे ही वाचा >> विश्लेषण : भूकंप दरवर्षी का होतात? त्यामागचं वैज्ञानिक कारण काय?

पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन

हे ही वाचा >> अतिक्रमणांच्या नावाखाली काश्मीरवासीय लक्ष्य; ‘पीडीपी’चा आरोप 

तुर्कस्तानमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित, वित्तहानीमुळे दुःख झाल्याचं ट्वीट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबांचं सांत्वन केलं आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 100 people dead after powerful 7 8 magnitude earthquake in turkey and syria asc